अफगाणिस्तानपुढे पाकने घेतले नमते; नवीन संघर्षात दोन्ही बाजूंचे डझनभर लोक ठार

इस्लामाबाद – पाकिस्तान आणि अफगाणिस्तान दरम्यान सीमाभागात नव्याने झालेल्या संघर्षामध्ये दोन्ही बाजूंचे किमान डझनभर लोक ठार झाल्यानंतर पाकिस्तानने अफगाणिस्तानबरोबर ४८ तासांची युद्धबंदी मान्य केली आहे. पाक सरकार आणि अफगाणिस्तानमधील तालिबान प्रशासनामध्ये ४८ तासांची हंगामी युद्धबंदी परस्परांच्या सहमतीने निश्चित करण्यात आली आहे. तालिबानच्या विनंतीवरून ही युद्धबंदी करण्यात आल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयाच्या हवाल्याने प्रसार माध्यमांनी म्हटले आहे.
आज (बुधवारी) संध्याकाळी ६ वाजल्यापासून या ४८ तासांच्या युद्धबंदीला प्रारंभ झाला. या ४८ तासांच्या कालावधीमध्ये दोन्ही बाजूंकडून या गुंतागुंतीच्या, पण सोडवता येण्यासारख्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी विधायक चर्चेच्या माध्यमातून प्रामाणिक प्रयत्न करणार आहेत, असेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. अफगाणिस्तान सरकारकडून या संदर्भात कोणतेही अधिकृत स्पष्टिकरण दिले गेलेले नाही.
तत्पूर्वी पाकिस्तानच्या सशस्त्र दलांनी अफगाणिस्तानच्या कंदहार प्रांतात आणि राजधानी काबूलमध्ये अचूक मारा केला होता. या माऱ्यात डझनभर विदेशी आणि अफगाणी हस्तक मारले गेल्याचा दावा देखील पाक सुरक्षा दलातील सूत्रांनी केला आहे. दोन्ही देशांदरम्यानच्या सीमेवर अफगाण तालिबानने केलेले हल्लेही परतवून लावले गेले आणि त्यावेळी ४० हल्लेखोरांना मारण्यात आल्याचा दावाही पाक लष्कराने केला.
बुधवारी पहाटे स्पिन बोल्दाक जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्याने केलेल्या हल्ल्यात डझनभराहून अधिक तालिबानी ठार आणि १०० जण जखमी झाल्याचे अफगाण तालिबानने म्हटले आहे. याशिवाय तालिबान्यांनी पाक-अफगाण फ्रेंडशीप गेट देखील उद्ध्वस्त करून टाकले आहे. फितना अल ख्वारिज आणि अफगाण तालिबानच्या काही ठिकाणी कुमक वाढल्याने सीमेजवळील परिस्थिती झपाट्याने बदलते आहे.
पाकिस्तानच्या हद्दीत टीटीपीच्या कारवाया वाढत असून तालिबानने या दहशतवाद्यांना आळा घालावा, असा पाकिस्तानचा आग्रह आहे. तर पाकिस्तान अफगाणिस्तानच्या हद्दीत शिरून घातपाती हल्ले करत असल्याचा आरोप तालिबानकडून केला जातो आहे.





