भारताच्या लष्करी तळांवर पाकिस्तानचा हल्ला, पण कोणतंही नुकसान नाही…

“पाकिस्ताननं सतवारी, सांबा, आरएसपुरा आणि अर्निया इथं 8 क्षेपणास्त्रं डागली आहेत, असे डीडी न्यूज या सरकारी वाहिनीने भारतीय संरक्षण खात्यातील सूत्रांच्या हवाल्याने सांगितले आहे. ही सर्व क्षेपणास्त्रं भारतीय हवाई संरक्षण प्रणालीच्या मदतीनं पाडण्यात आली. तर सध्या जम्मू आणि काश्मीरमधील राजौरीमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट करण्यात आले आहे.
गेल्या काही तासांत पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात मृत्यू झालेले सर्व लोक याच भागातील आहेत. पुंछमध्येही पूर्ण ब्लॅकआऊट असून त्याठिकाणीही सायरनचे आवाज येत आहेत.
“जम्मू आणि काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेजवळील जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरमधील लष्करी तळांवर पाकिस्तानने क्षेपणास्त्रे आणि ड्रोन वापरून हल्ला केला. यात कोणतंही नुकसान झाले नाही. भारतीय सशस्त्र दलांनी एसओपीनुसार हा धोका परतवून लावला.” असे भारतीय लष्कराने सांगितले आहे.
याबरोबरच चंदिगढ शहरातही सायरन वाजवण्यात आले असून तात्काळ ब्लॅकआऊटचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच गुजरातच्या कच्छ भागातील भुजमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट करण्यात आले आहे. दरम्यान, जम्मू विमानतळावर स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. बाजारपेठा बंद होत्या आणि त्यांनी लोकांना पळताना पाहिले. सायरन वाजून शहरात वीज गेल्याचे तेथिल लोक सांगत आहेत.
“पाकिस्तान जम्मूला दारुगोळ्याचा मारा करून लक्ष्य करत आहे. शस्त्र वाहून नेणाऱ्या ड्रोनचा वापर ते करत आहेत. ही ड्रोन्स किंवा loitering munitions (लॅायटरिंग म्युनिशन्स) आहेत. कामिकाझे ड्रोन्स म्हणूनही ओळखली जातात. टार्गेट शोधून मग त्याला धडकतात. यासाठीच जम्मूत ब्लॅकआऊट केलं आहे.” असे एशियन न्यूज इंटरनॅशनल या वृत्तसंस्थेने एका वृत्तात सांगितले आहे. पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारतीय हवाई संरक्षण दल चोख प्रत्युत्तर देत आहे.





