पाकिस्तान ताळ्यावर! पाण्यासाठी भारतापुढे पुन्हा पसरले हात; सिंधु जल कराराबाबत म्हणाला, ‘गंभीर जलसंकट…’

नवी दिल्ली : पहलगाम (जम्मू-काश्मीर) येथे २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर भारताने सिंधु जल करार निलंबित करण्याचा कठोर निर्णय घेतला. यामुळे संकटात सापडलेल्या पाकिस्तानने आता भारतासमोर गयावया सुरू केली आहे. पाकिस्तानच्या जलसंसाधन मंत्रालयाने भारताच्या जलशक्ती मंत्रालयाला पत्र लिहून करार निलंबनाच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे.
माध्यम अहवालांनुसार, पाकिस्तानने पत्रात म्हटले आहे की, भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानात गंभीर जलसंकट निर्माण होऊ शकते. या मुद्यावर चर्चा करण्यास पाकिस्तान तयार असल्याचेही पत्रात नमूद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच राष्ट्राला संबोधित करताना सख्त संदेश दिला होता की, “रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही.” भारत आता रावी, ब्यास आणि सतलज या तीन नद्यांच्या पाण्याचा स्वतःच्या गरजेसाठी वापर करण्याची योजना आखत असून, यावर तातडीने काम सुरू झाले आहे.
सिंधु जल करार हा सप्टेंबर १९६० मध्ये विश्व बँकेच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेला जलवाटप करार आहे. हा करार सिंधु, झेलम, चिनाब, रावी, ब्यास आणि सतलज या सहा नद्यांच्या पाण्याच्या वापराचे नियमन करतो. करारानुसार, सिंधु नदी प्रणालीच्या ८०% पाण्याचा वाटा पाकिस्तानला मिळतो, तर भारताला १९.५% पाणी मिळते. भारत आपल्या वाट्यापैकी ९०% पाणीच वापरतो.
पाकिस्तानच्या या विनंतीमुळे भारत-पाक संबंधांमधील तणाव पुन्हा चर्चेत आला आहे.





