“सिंधू जल करार आमच्यासाठी लक्ष्मणरेषा…”; पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर नेमकं काय म्हणाले?

Pakistan Army Chief Field Marshal Asim Munir : सिंधू पाणी करार स्थगित करण्याच्या भारताने घेतलेल्या निर्णयावर पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी यास लक्ष्मण रेखा म्हटले असून पाण्याशी संबंधित बाबींवर इस्लामाबाद कधीही झुकणार नाही, असे म्हटले आहे.
तसेच सिंधू पाणी कराराच्या मुद्द्यावर पाकिस्तान कधीही तडजोड करणार नाही, कारण तो देशाच्या २४ कोटी नागरिकांच्या मूलभूत हक्कांशी थेट जोडलेला आहे, असे विधान मार्शल यांनी पाकिस्तानी लष्कराची मीडिया विंग इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) नुसार, विविध विद्यापीठांचे कुलगुरू, प्राचार्य, वरिष्ठ शिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञांशी झालेल्या चर्चेदरम्यान केले आहे.
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी करार झाल्यानंतर काही आठवड्यांनंतर, पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांनी म्हटले आहे की, इस्लामाबाद दक्षिण आशियाई प्रदेशात भारताचे वर्चस्व कधीही स्वीकारणार नाही. पाणी ही पाकिस्तानची लाल रेषा आहे आणि आम्ही २४ कोटी पाकिस्तानी लोकांच्या या मूलभूत अधिकाराशी कोणतीही तडजोड करू देणार नाही.
२२ एप्रिल या दिवशी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी २६ भारतीय पर्यटकांची गोळ्या झाडून निर्घूनपणे हत्या केली. या भ्याड हल्लानंतर भारवासीयांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळून आली होती. दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीने (सीसीएस) बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत १९६० चा सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता.
भारताने राजनैतिक मुत्सद्देगिरीसाठी आणि सिंधू पाणी कराराच्या रद्द करण्यासाठी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी जगातील विविध देशांमध्ये सात सर्वपक्षीय शिष्टमंडळे पाठवली आहेत. सिंधू पाणी करार हा भारत आणि पाकिस्तानमधील सिंधू, झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज या सहा नद्यांच्या पाण्याच्या वाटप आणि व्यवस्थापनावर आधारित आहे.





