PAK vs BAN : शाकिब अल हसनला मैदानातील ‘ती’ कृती पडली महागात, ICCनं ठोठावला मोठा दंड, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण…

Shakib Al Hasan PAK vs BAN 1st Test : शाकिब अल हसन केवळ त्याच्या कामगिरीमुळेच नाही तर त्याच्या कृत्यांमुळेही चर्चेत असतो. त्याच्या या वृत्तीमुळे त्याला खूप त्रास सहन करावा लागला आहे. याचे ताजे उदाहरण रावळपिंडी कसोटी सामन्यादरम्यान पाहायला मिळाले. या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानचा 10 गडी राखून पराभव केला. या सामन्यादरम्यान शाकिबने रागाच्या भरात चेंडू फेकला होता. यासाठी आयसीसीने त्याला दंड ठोठावला आहे. दंडासोबतच शाकिबचे आणखी एक नुकसान झाले आहे.
वास्तविक, आयसीसीने शाकिबला मॅच फीच्या 10 टक्के दंड ठोठावला आहे. यासोबतच 1 डिमेरिट पॉइंटही देण्यात आला आहे. त्याने आयसीसीच्या आचारसंहितेअंतर्गत लेव्हल 1 चा गुन्हा केला आहे. पाकिस्तानच्या डावाच्या 33व्या षटकात शाकिबने रागाने चेंडू मोहम्मद रिझवानच्या दिशेने फेकला. रिझवान मागे पाहत होता आणि मग साकिब गोलंदाजी करायला धावला. पण रिझवान तयार नव्हता. यावर तो संतापला आणि त्याने चेंडू जोराने रिझवानच्या दिशेने फेकला. यात रिझवानला दुखापत होण्याची शक्यता होती. हे पाहून पंचांनीही नाराजी व्यक्त केली होती.
Mental state like Shakib Al Hasan
Academic performance like Babar Azam 💀pic.twitter.com/G3noKlmhzr— Dinda Academy (@academy_dinda) August 25, 2024
आयसीसी दंड कधी आणि कसा लावते?
शाकिबला कलम 2.9 अंतर्गत दंड ठोठावण्यात आला आहे. आयसीसीने आपल्या वेबसाइटवरही याबाबत माहिती दिली आहे. या अंतर्गत, जर एखाद्या खेळाडूने चेंडू, बॅट किंवा पाण्याच्या बाटलीसह इतर कोणतीही वस्तू फेकली तर त्याला मॅच फीच्या 10 टक्के दंड आकारला जातो. तथापि, केवळ या घटकावर दंडाचा निर्णय होत नाही; यातून इतर कोणत्याही खेळाडूला किंवा पंचाला इजा तर झालेली नाही हे देखील पाहिले जाते. तसे झाले तर त्यासाठी वेगळी तरतूद आहे.
बांगलादेश-पाकिस्तानलाही दंड…
आयसीसीने पाकिस्तान आणि बांगलादेश संघावर दंडही ठोठावला आहे. पहिल्या कसोटीत स्लो ओव्हर रेटमुळे पाकिस्तानला मॅच फीच्या 30 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. यासोबतच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतूनही गुण देखील वजा करण्यात आले आहेत. बांगलादेशला मॅच फीच्या 15 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे.





