PAK vs BAN 1st Test (Day 2 Stumps) : शकील-रिझवानची दमदार शतके, बांगलादेशविरुद्ध पाकिस्तानचे शानदार पुनरागमन…

PAK vs BAN 1st Test (Rawalpindi,Day 2 Stumps) : कालच्या दिवशी नाबाद असलेले सैद शकील व मोहम्मद रिझवान यांनी दुसऱ्या दिवशी शतकी खेळी करताना पाकिस्तान संघाला मजबूत स्थितीत आणले. पाकिस्तानने 113 षटकांत 3.96 च्या सरासरीने 6 बाद 448 धावांपर्यंत मजल मारताना डाव घोषित केला. शेवटच्या सत्रातील 12 षटके खेळताना बांगलादेश संघाने बिनबाद 27 अशी सावध सुरुवात केली. सलामीवीर शादमान इस्लाम 12 तर झाकीर हसन 11 धावांवर खेळत आहेत.
– पाकिस्तानचा डाव 448 धावांवर घोषित
– बांगलादेश दुसऱ्या दिवसअखेर बिनबाद 27
काल लढतीच्या पहिल्या दिवशी पाकिस्तान संघाने 4 बाद 158 धावांपर्यंत मजल मारली होती. आज दुसऱ्या दिवशी सौद शकील (56) व मोहम्मद रिझवान (24) यांनी खेळायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी भेदक वाटणारी बांगलादेशची गोलंदाजी सामान्य असल्याचे दोन्ही फलंदाजानी दाखवून दिले. शकील आणि रिझवान यांनी पाचव्या गड्यासाठी 386 चेंडूत 240 धावांची मोठी भागीदारी करताना आपापली शतके साजरी केली. या भागीदारीत रिझवानने 128 धावा तर शकीलने 99 धावा केल्या. सौद शकीलने 261 चेंडूचा सामना करताना 9 चौकारांच्या साहाय्याने 141 धावांची खेळी केली. रिझवानने 239 चेंडूत 11 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 171 धावांची खेळी केली. सैद शकील बाद झाल्यानंतर आघा सलमान फलंदाजीसाठी आला. त्याने 19 धावांचे योगदान दिले. यावेळी पाकिस्तानने 6 बाद 398 धावा केल्या होत्या. त्यानंतर आलेल्या शाहीन शाह आफ्रिदीने नाबाद 29 धावांची खेळी करताना रिझवानला सुरेख साथ दिली. त्यानंतर पाकिस्तानने 448 धावांवर डाव घोषित केला.
बांगलादेश संघाची गोलंदाजी ढेपाळली
पहिल्या दिवशी बांगलादेशच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करताना पाकिस्तानचे तीन फलंदाज झटपट बाद केल्याने पाकिस्तानची अवस्था 8.2 षटकांत 3 बाद 16 अशी झाली होती. त्यानंतर सैम अयुब व सौद शकील यांनी अर्धशतकी भागीदारी करताना गोलदाजांना लगाम लावण्याचा प्रयत्न केला होता. शेवटच्या सत्रात अयुबच्या रूपाने बांगलादेशने अजून एक फलंदाज तंबूत पाठवायला होता. दुसऱ्या दिवशी भेदक वाटणारी गोलंदाजी पाकिस्तानच्या फलंदाजीसमोर किरकोळ वाटत होती. काल शरीफुल इस्लाम व हसन महमूद यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले होते. परंतु आज त्यांना एकही गडी बाद करता आला नाही. मेहंदी हसन व शाकिबने आजच्या दिवसात प्रत्येकी 1 गडी बाद केला.
Bangladesh trail by 421 runs at the end of Day Two of the first Test 🏏#PAKvBAN | #TestOnHai pic.twitter.com/Nwf9Yde5Ei
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 22, 2024
बांगलादेशची सावध सुरुवात
पाकिस्तानच्या 448 धावांच्या आघाडीसमोर बांगलादेश संघाने सावध सुरुवात केली. बांगलादेश संघाने बिनबाद 27 अशी धावसंख्या उभारली. बांगलादेशचा सलामीवीर शादमान इस्लामने 2 चौकारांच्या मदतीने 12 तर झाकीर हसनने 1 चौकर मारताना 11 धावा करताना नाबाद राहिले. दिवसअखेर पाकिस्तान संघाकडे 421 धावांची मजबूत आघाडी आहे. उद्या (शुक्रवारी) लढतीच्या तिसऱ्या बांगलादेश किती धावांपर्यंत मजल मारतो, यावर लढतीचा निकाल अवलंबून असणार आहे.
ENG vs SL 1st Test : वोक्स-बशीरचा गोलदांजीत कहर, पहिल्या डावात श्रीलंकेला 236 धावांत गुंडाळले…
संक्षिप्त धावफलक –
पाकिस्तान : पहिला डाव : 113 षटकांत 6 बाद 448 (घोषित) मोहम्मद रिझवान नाबाद 171 (11 चौकार व 3 षटकार), सौद शकील 141 (9 चौकार), सैम अयुब 56 (4 चौकार, 1 षटकार), शाहीन शाह आफ्रिदी 29 (1 चौकार, 2 षटकार) शरीफुल इस्लाम 23-4-७७-2, हसन महमूद 23-4-70-2, मेहंदी हसन 21-1-80-1, शाकिब हसन 27-3-100-1 आणि बांगलादेश : पहिला डाव : 12 षटकांत बिनबाद 27, शादमान इस्लाम 12 (2 चौकार), झाकीर हसन 11 (1 चौकार)





