नवी दिल्ली: न्यूयॉर्क येथे आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी जाणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विमानाला हवाई हद्दीची परवानगी मिळावी यासाठी भारताची विनंती पाकिस्तानकडून नाकारण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विमानासाठी आमच्या हवाई हद्दीचा वापर करू देणार नाही, असे आम्ही भारतीय उच्चायुक्तांना कळवले असल्याचे पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी सांगितले आहे.
27 सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदी अमेरिका दौऱ्यावर जाणार असल्याने आज दुपारीच भारताकडून पाकिस्तानला या दौऱ्यासाठी हवाई हद्दीची परवानगी मिळण्यासाठी रितसर विनंती करण्यात आली होती. मात्र पाकिस्तानने भारताची ही विनंती फेटाळत मोदींच्या दौऱ्यासाठी पाकिस्तानचा हवाई मार्ग खुला करण्यास नकार दर्शवला आहे.
भारताने हवाई हद्दीच्या परवानगीसाठी विनंती केल्यानंतर सध्या दोन्ही देशांमध्ये असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या विनंतीवर सल्लामसलत करून निर्णय घेण्यात येईल, असे पाकिस्तानकडून सांगण्यात आले होते. यापूर्वी पाकिस्तानने जून महिन्यात एससीओच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी किर्गिस्तानच्या बिश्केक शहरात जाण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या विमानाला परवानगी दिली होती.