पहलगाम हल्ल्यावर ठाकरे गटाचा हल्लाबोल: “मोदी सरकारचा नुसता गडगडाट, जो गरजते हैं वो बरसेंगे क्या?”

आळंदी : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याला दहा दिवस उलटूनही केंद्र सरकारकडून ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी केला. “नुसता गडगडाट, जो गरजते हैं वो बरसेंगे क्या?” असा सवाल करत त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली.
पंतप्रधानांनी सैन्याला “वेळ आणि ठिकाण ठरवा” अशी मोकळीक दिल्याचे जाहीर केले, पण ही घोषणा फसवी असल्याचा गंभीर आरोप गोटे यांनी केला. ते म्हणाले, “इंदिरा गांधींनी निर्णायक कारवाई केली, पण आजचे नेतृत्व जाहिरातबाजी आणि श्रेयासाठीच ओळखले जाते. शहीदांच्या कुटुंबांना दिलेली मदत अपुरी आहे. राजकीय टीकेपेक्षा कृती हवी.”
दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) हल्ल्याच्या तपासात महत्त्वाचे पुरावे हाती लागल्याचे स्पष्ट झाले. दहशतवाद्यांनी हत्यारे बेताब खोऱ्यात लपवली होती. हल्ल्यामागे लश्कर-ए-तैयबा, पाकिस्तानच्या आयएसआय आणि हमासचा कट असल्याचे उघड झाले. पाकिस्तानमधून पूर्वनियोजित ही कारवाई झाली असून, एक संशयित हमासच्या रॅलीत सहभागी होता, असे सूत्रांनी सांगितले. गोटे यांनी सरकारला राजकीय शाब्दिक युद्ध थांबवून दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.





