पुणे जिल्हा | आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात भात लावणी सुरू

मंचर, (प्रतिनिधी) – आंबेगाव तालुक्याचा पश्चिम आदिवासी भाग हा भात शेतीचे आगार म्हणून ओळखला जातो. आदिवासी भागात जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने सुरुवात केली असली तरी भात लावण्याइतका समाधानकारक पाऊस पडल्याने भात आवणीला (लावणीला) प्रारंभ झाला आहे.
भीमाशंकर, कोंढवळ,पोखरी,निगडाळे, तळेघर, पाटण,भागीतवाडी, असाणे, आहुपे,तिरपाड,डिंभे आदी गावात भात आवणीला (लावणीला) प्रारंभ झाला आहे. या वर्षी पावसाने काही भागात उशिरा हजेरी लावली आहे. आदिवासी भागात जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने सुरुवात केली असली तरी भात लावण्याइतका समाधानकारक पाऊस पडला आहे.
भीमाशंकर,पाटण,आहुपे खोऱ्यातील शेतकरी प्रामुख्याने भात हेच पीक घेतात. या भागात इंद्रायणी,जीर,तांबडा रायभोग,खडक्या,कोळंबा,कावेरी या भात पिकांची लावणी केली जाते. भात रोपे लावणीकरिता सुरुवातीला चारही बाजूला बांध करून शेतात चिखल केला जातो. त्यानंतर भाताची रोपे ओळीने लावून घेतली जातात.
सध्या मजुरांची टंचाई भासत असल्याने काही शेतकरी घरच्या घरी तर काही शेतकरी अडीचशे ते तीनशे रुपये रोजाने मजूर शोधून आणून भात लावणी करत आहेत. मजुरांचे दरही जास्त असल्याने काही शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे.
काही शेतकरी डोंगर उतारावर नाचणीचे पीक घेत आहे. तालुका कृषी कार्यालयाने वेळेत खते,औषधे,पिक विमा योजना याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा शेतकरी बांधवानी व्यक्त केली आहे.
कोट : आजच्या आधुनिक युगात ट्रॅक्टरशिवाय बैल जोडीच्या सहाय्याने चिखल (गाळ) करून भात लावणीची पद्धत या भागात आजही पहावयास मिळते. बाहेर गावी नोकरी,व्यवसाय करणारे शेतकरीही सुट्टी काढून इर्जिक पद्धतीने एकमेकांच्या शेतीच्या कामासाठी मदतीला जाण्याची पद्धत अजूनही या भागात टिकून आहे. – मारुती लोहकरे, शेतकरी निगडाळे.
आदिवासी भागात पावसाला सुरुवात झाल्याने भात आवणीला प्रारंभ झाला आहे. मंजुरांची टंचाई भासत असल्याने आम्ही कुटुंबातील सदस्याकडून भात रोपांची अवनी करीत आहोत.- दुंदा विठ्ठल कुऱ्हाडे (भात उत्पादक शेतकरी,निगडाळे)
“जुलै महिन्यात पाऊस कमी पडत असल्याने भात रोपांची अवनी करताना अडचणी येत आहे. पाऊस जर वेळेवर पडला नाही तर भात उत्पन्नावर परिणाम होईल.” -चिंधू शंकर लोहकरे (निगडाळे गावातील भात उत्पादक शेतकरी)





