Vadgaon Maval : भातपिकांना पावसाची प्रतीक्षा; पावसाच्या दडीने ग्रामीण अर्थचक्राला ब्रेक
Vadgaon Maval : काही ठिकाणी जमिनींना भेगा, रोपे पिवळसर

– प्रभाकर तुमकर
वडगाव मावळ – मावळ तालुक्यात पावसाने दडी मारल्याने शेतीचे गणित बिघडू लागले असून, त्याचा थेट परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर जाणवू लागला आहे. भातपिके सध्या वाढीपासून दाणे भरण्याच्या महत्त्वाच्या अवस्थेत असताना पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. काही भागांत जमिनीतील ओलावा कमी होऊन भेगा पडू लागल्या आहेत, तर काही ठिकाणी भाताची रोपे पिवळसर पडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पिकांच्या उत्पादनाबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
मावळ तालुक्याची ग्रामीण अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात शेतीवर अवलंबून आहे. शेतातून मिळणारे उत्पन्न हे केवळ शेतकऱ्यांच्या कुटुंबापुरते मर्यादित राहत नाही. त्यातून शेतमजुरी, कृषी साहित्य, खते, औषधे, बियाणे, ट्रॅक्टर व मशागतीची साधने, किराणा, दूध व्यवसाय तसेच गावातील विविध छोट्या-मोठ्या व्यवसायांची उलाढाल सुरू राहते. त्यामुळे शेतीचे चक्र सुरळीत राहिल्यास गावातील आर्थिक व्यवहारांनाही चालना मिळते. मात्र, यंदा पावसाचा खंड वाढल्याने हे आर्थिक चक्र काही प्रमाणात मंदावल्याचे चित्र अनेक गावांत दिसून येत आहे.
पावसाची गरज असलेल्या काळातच पावसाने ओढ दिल्याने शेतीतील काही कामांचा वेग मंदावला आहे. भातपिकाच्या वाढीसाठी आवश्यक असलेला जमिनीतील ओलावा कमी होत असल्याने शेतकऱ्यांना पिकांची सतत पाहणी करावी लागत आहे. काही ठिकाणी शेतातील पाण्याची पातळी कमी झाली असून, पिकांना ताण जाणवू लागला आहे. पाऊस पुन्हा वेळेत झाला तर परिस्थिती नियंत्रणात राहू शकते; मात्र आणखी काही दिवस पाऊस लांबल्यास पिकांच्या वाढीवर तसेच दाणे भरण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पावसाअभावी शेतीची कामे रखडल्याने त्याचा फटका शेतमजुरांनाही बसत आहे. शेतीतील कामांचा हंगाम वाढला की रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांना नियमित रोजगार उपलब्ध होतो. शेतातील कामातून मिळणारा पैसा पुन्हा गावातील किराणा दुकाने, आठवडे बाजार, छोटे व्यावसायिक आणि अन्य सेवांवर खर्च होतो. त्यामुळे ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहाराला चालना मिळते. मात्र, सध्या शेतीची कामे अपेक्षित वेगाने सुरू नसल्याने अनेक मजुरांच्या हाताला नियमित काम मिळत नाही. रोजंदारीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांना घरखर्च भागविण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पिकाच्या उत्पादनाबाबत अनिश्चितता
भातपीक सध्या उत्पादनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यात आहे. पिकाची वाढ, कणसांची निर्मिती आणि दाणे भरण्याच्या प्रक्रियेसाठी या काळातील हवामान महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत पाऊस किती आणि कसा होतो, यावर पिकाचे भवितव्य मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. पाऊस आणखी लांबल्यास उत्पादनात घट होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
कृषी साहित्याच्या विक्रीवर परिणाम
पिकांची स्थिती अनिश्चित असल्याने शेतकरीही खर्च करताना सावध भूमिका घेत आहेत. खते, औषधे, बियाणे आणि अन्य कृषी साहित्याची खरेदी गरजेपुरतीच केली जात आहे. पाऊस झाल्यास पुढील खर्च करायचा आणि पाऊस न झाल्यास नुकसान टाळण्यासाठी खर्च कमी ठेवायचा, अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे. शेतीवर होणारा खर्च कमी झाल्याने त्याचा परिणाम गावातील इतर व्यवसायांवरही अप्रत्यक्षपणे होत आहे.
शेतकऱ्यांच्या हातात पैसा आला की तो स्थानिक बाजारपेठेत खर्च होतो. मात्र, पिकाचे भवितव्य स्पष्ट नसल्याने सध्या अनेक शेतकरी अनावश्यक खरेदी टाळत आहेत. त्यामुळे ग्रामीण बाजारपेठेतील व्यवहार काही प्रमाणात मंदावल्याचे व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे.
पशुपालकांचीही चिंता वाढली
पावसाचा खंड वाढल्याने हिरव्या चाऱ्याच्या उपलब्धतेवरही परिणाम होऊ लागला आहे. काही भागांत हिरवा चारा कमी पडू लागल्याने पशुपालकांना विकतचा चारा घेण्याची वेळ येत आहे. त्यामुळे जनावरांच्या संगोपनाचा खर्च वाढत आहे. चारा, पशुखाद्य आणि अन्य खर्च वाढत असताना दूध उत्पादनात घट झाली तर त्याचा थेट परिणाम दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होऊ शकतो. त्यामुळे शेतीसोबतच पशुपालनावर अवलंबून असलेल्या कुटुंबांमध्येही चिंता वाढली आहे.
‘पावसाचा खंड वाढल्याने पिकांच्या उत्पादनाची चिंता आहे. उत्पादन किती मिळेल, याची खात्री नाही. शेतीतून उत्पन्न मिळाले नाही, तर घरखर्च आणि पुढील शेतीचा खर्च कसा भागवायचा, हा प्रश्न आता सतावू लागला आहे.’ – काळुराम मालपोटे, शेतकरी.
Pune District : दुष्काळग्रस्त शेतकर्यांना सरसकट आर्थिक मदत द्या





