Pune District : दुष्काळग्रस्त शेतकर्यांना सरसकट आर्थिक मदत द्या
Pune District : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांनी 28 सप्टेंबर 2026 रोजी मुख्यमंत्री यांना दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने विविध उपाययोजना व तरतुदी करण्याबाबत निवेदन दिले आहे.

राजगुरुनगर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी, पिकांच्या नुकसानीची भरपाई करावी तसेच दूध उत्पादक शेतकर्यांच्या दूध दरात तातडीने वाढ करावी, या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने खेड तहसीलदार प्रशांत बेडसे यांना निवेदन देण्यात आले.
खेड तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, दूध उत्पादक आणि ग्रामीण जनता दुष्काळामुळे विविध अडचणींचा सामना करीत आहे. पाणीटंचाई, पिकांचे नुकसान, जनावरांसाठी चारा व पाण्याचा प्रश्न, रोजगाराची कमतरता आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकर्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकर्यांना सरसकट आर्थिक मदत देण्याबरोबरच पिकांच्या नुकसानीची भरपाई, जनावरांसाठी चारा व पाण्याची व्यवस्था आणि रोजगाराच्या आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांनी 28 सप्टेंबर 2026 रोजी मुख्यमंत्री यांना दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने विविध उपाययोजना व तरतुदी करण्याबाबत निवेदन दिले आहे. त्याच मागण्यांच्या अनुषंगाने खेड तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी व नागरिकांना शासनाच्या सवलती आणि मदत तातडीने मिळावी, अशी मागणी पक्षाच्या पदाधिकार्यांनी केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खेड तालुका अध्यक्ष हिरामण सातकर, युवक अध्यक्ष देविदास शिंदे, जिल्हा विधी कक्षाचे अध्यक्ष अॅड. दिलीप करंडे, खेड तालुका सुधारणा समितीचे अध्यक्ष अॅड. हरिप्रसाद खळदकर, अॅड. विशाल जरे, प्रशांत सातकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दूध दरातही वाढ करा
दरम्यान, दूध उत्पादनासाठी लागणारा चारा, पशुखाद्य, औषधे, मजुरी तसेच अन्य खर्च सातत्याने वाढत असताना शेतकर्यांना मिळणारा दूध दर समाधानकारक नसल्याने दूध उत्पादक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे दूध दरात तातडीने वाढ करून दूध उत्पादक शेतकर्यांना दिलासा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.





