Pabal Robbery: पाबळमध्ये मध्यरात्री दरोडा! घरात घुसून तिघांना बेदम मारहाण; महिलेचे दागिने लांबवले
Pabal Robbery: घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे (LCB) अधिकारी घटनास्थळी दाखल; आरोपींचा शोध सुरू.

Pabal Robbery – पाबळ (ता. शिरुर) येथील चौधरी वस्ती येथे मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास एका कुटुंबातील तिघांना बेदम मारहाण करीत महिलेचे दागिने लांबवले. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तीन चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. चोरट्यांच्या मारहाणीत ज्योती चौधरी, संदीप चौधरी व आयुष चौधरी (रा. चौधरी वस्ती पाबळ) हे जखमी झाले आहेत.
पाबळ येथील चौधरी वस्ती येथील संदीप चौधरी व ज्योती चौधरी हे दाम्पत्य रात्रीच्या वेळी त्यांच्या कुटुंबीयांसह जेवण करुन घरात झोपलेले होते. रात्री अडीचच्या सुमारास अचानकपणे ज्योती यांना मारहाण होत असल्याने त्या जाग्या झाल्या. त्यावेळी तिघे ज्योती यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावत असल्याचे दिसले. मात्र, त्यावेळी तिघेजण पळून गेले.
यावेळी ज्योती चौधरी, संदीप चौधरी व त्यांचा मुलगा आयुष चौधरी यांना मारहाण करीत जखमी केले. यावेळी मुलगी तन्वी व ज्योती यांची सासू सुंदराबाई चौधरी यांना मारहाण झाली नाही. यावेळी तन्वी चौधरी हिने गावातील लोकांना फोन करत माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले, पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, जितेंद्र पानसरे,
हवालदार गणेश सुतार, आत्माराम तळोले, गणपत होले, नवनाथ केंद्रे, अमोल नलगे, विशाल देशमुख, मच्छिंद्र निचित, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे हवालदार विकास पाटील, सागर धुमाळ आदींनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. याबाबत ज्योती चौधरी यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे खबर दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अंकुश कारंडे हे करीत आहेत.





