Shirur : पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतरही बदली झालेले अधिकारी-कर्मचारी जुन्याच ठिकाणी; कार्यमुक्तीला विलंब का?
Shirur : पुणे ग्रामीण पोलिस दलातील बदली आदेशानंतरही काही अधिकारी-कर्मचारी जुन्याच पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याने कार्यमुक्तीच्या अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Shirur : पुणे ग्रामीण पोलिस दलातील नियतकालिक बदल्यांचे आदेश होऊन बराच कालावधी उलटला असतानाही काही अधिकारी व कर्मचारी अद्याप जुन्याच पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याने बदली आदेशांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बदली झालेल्यांना कार्यमुक्त करण्याचे निर्देश पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी वायरलेसवरून दिल्याचे सांगितले जात असतानाही काही ठिकाणी आदेशाची अंमलबजावणी झालेली नसल्याची चर्चा आहे.
यापूर्वी ‘दैनिक प्रभात’ने ‘बदलीचे आदेश कागदावरच; पोलिस कर्मचारी-अधिकाऱ्यांना कार्यमुक्त कधी करणार?’ या वृत्तातून हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधितांना कार्यमुक्त करण्याचे निर्देश दिले.
मात्र, काही अधिकारी-कर्मचारी अद्याप जुन्याच ठिकाणी असल्याने आदेशाची अंमलबजावणी नेमकी कुठे अडली, असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान, काही अधिकारी-कर्मचाऱ्यांना जुन्याच ठिकाणी ठेवण्यासाठी ‘विशेष’ प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे. तसेच जुन्या पोलीस ठाण्यातील ‘कलेक्शन’ व्यवस्थेमुळे काही जण बदलीनंतरही पदभार सोडण्यास इच्छुक नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. मात्र, या चर्चेची अधिकृत पुष्टी झालेली नाही.
बदलीनंतर कार्यमुक्त करून नवीन नियुक्तीच्या ठिकाणी रुजू करणे ही नियमित प्रशासकीय प्रक्रिया आहे. त्यामुळे कोणत्या अधिकाऱ्याला कधी कार्यमुक्त केले, कोण नवीन ठिकाणी रुजू झाले आणि कोण अद्याप जुन्या ठिकाणी कार्यरत आहे, याची माहिती प्रशासनाने स्पष्ट करणे गरजेचे आहे.
आदेशाचे पालन न झाल्यास जबाबदारी निश्चित करून कारवाई होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.





