Alandi Crime : आळंदीत झोपण्याच्या जागेवरून वाद; लोखंडी सळईने मारहाण, तरुणाचा खून
Alandi Crime : आळंदीत झोपण्याच्या जागेवरून झालेल्या वादातून लोखंडी सळईने मारहाण करून तरुणाचा खून. आळंदी पोलिसांनी अवघ्या एका तासात आरोपीला अटक केली.

Alandi Crime : आळंदी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या एका तासात आरोपीला अटक केली. झोपण्याच्या जागेवरून झालेल्या वादातून लोखंडी सळईने डोक्यावर, तोंडावर आणि पायावर मारहाण करून बाबासाहेब उर्फ राहुल साहेबराव कांबळे यांचा खून केल्याची घटना १७ ऑगस्ट रोजी रात्री आळंदी येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृंदावन स्नॅक्स भोजनालयासमोर प्रदक्षिणा रोडवरील भाई मनोहर कोतवाल गोदी कामगार धर्मशाळा ट्रस्टच्या शेडमधील मोकळ्या जागेत ही घटना घडली. रात्री सुमारे १०.४० वाजता आरोपी अनंत दिगंबर तौर (रा. शेलगाव धाडी, ता. माजलगाव, जि. बीड) याचा मयत राहुल कांबळे याच्यासोबत झोपण्याच्या जागेवरून वाद झाला. या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. आरोपीने लोखंडी सळईने कांबळे यांच्या डोक्यावर, तोंडावर व पायावर मारहाण केली. यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी दत्तात्रय कांदे यांनी तक्रार दिली. आळंदी पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत अवघ्या एका तासात आरोपी अनंत तौर याला अटक केली.
मयत बाबासाहेब उर्फ राहुल कांबळे हे मूळचे लिंबाची वाडी, जि. बीड येथील रहिवासी होते. या घटनेमुळे आळंदी परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.





