काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांची प्रकृती बिघडली, भोवळ आल्याने रूग्णालयात दाखल

अहमदाबाद – माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम यांना गुजरात येथील साबरमती आश्रमात भोवळ आली. त्यामुळे त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती त्यांचे खासदारपुत्र कार्ती यांनी दिली.
कॉंग्रेसच्या अधिवेशनासाठी ७९ वर्षीय चिदंबरम गुजरातमध्ये दाखल झाले. अहमदाबादेतील साबरमती आश्रमात ते पक्षाच्या इतर नेत्यांसमवेत प्रार्थना सभेत सहभागी झाले. त्यावेळी त्यांना अचानकपणे भोवळ आली. काही काळ त्यांची शुद्ध हरपली. त्यांना काही नेत्यांनी रूग्णवाहिकेपर्यंत नेले. त्यानंतर तपासणीसाठी त्यांना रूग्णालयात हलवण्यात आले.
#WATCH | Ahmedabad, Gujarat: Congress leader P Chidambaram fell unconscious due to heat at Sabarmati Ashram and was taken to a hospital. pic.twitter.com/CeMYLk1C25
— ANI (@ANI) April 8, 2025
दरम्यान, काँग्रेसचे ८४ वे अधिवेशन आज अहमदाबादमध्ये सुरू झाले आहे. ते दोन दिवस (८ आणि ९ एप्रिल) चालेल. पक्ष ६४ वर्षांनंतर गुजरातमध्ये हा कार्यक्रम आयोजित करत आहे. यापूर्वी १९६१ मध्ये भावनगर येथे अधिवेशन झाले होते. स्वातंत्र्यानंतर गुजरातमध्ये काँग्रेसचा हा पहिला कार्यक्रम होता.
मुख्य अधिवेशन ९ एप्रिल रोजी होणार आहे, ज्यामध्ये देशभरातील १,७०० हून अधिक काँग्रेस समितीचे प्रतिनिधी सहभागी होतील. हा कार्यक्रम साबरमती रिव्हर फ्रंट येथे होईल. येथे एक व्हीव्हीआयपी घुमट बांधण्यात आला आहे. या अधिवेशनाचा विषय , ‘न्यायाचा मार्ग: संकल्प, समर्पण आणि संघर्ष’ आहे.





