P. Chidambaram : चिदंबरम यांच्यावर कॉंग्रेस श्रेष्ठी नाराज ! ऑपरेशन ब्लू स्टार विषयीच्या वक्तव्यामुळे पक्षाची कोंडी

नवी दिल्ली : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम यांनी ऑपरेशन ब्लू स्टार म्हणजे चूक होती अशा आशयाचे वक्तव्य केले. ते स्वपक्षाचीच कोंडी करणारे ठरले आहे. त्या पार्श्वभूमीवर, चिदंबरम यांच्यावर कॉंग्रेस श्रेष्ठी प्रचंड नाराज असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. पंजाबच्या अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात जर्नेलसिंग भिंद्रनवाले याच्या नेतृत्वाखाली दहशतवाद्यांनी आश्रय घेतला. त्यांना हटवण्यासाठी वर्ष १९८४ मधील जूनच्या प्रारंभी ऑपरेशन ब्लू स्टार या नावाने लष्करी मोहीम राबवण्यात आली.
शीख समुदायाचे पवित्र तीर्थक्षेत्र असणाऱ्या सुवर्ण मंदिरातील त्या मोहिमेविषयी तीव्र नाराजीचा सूर उमटला. तशातच तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची ३१ ऑक्टोबर १९८४ यादिवशी त्यांच्या शीख अंगरक्षकांनी हत्या केली. त्या घडामोडींचा संदर्भ घेऊन ८० वर्षीय चिदंबरम यांनी हिमाचल प्रदेशातील पुस्तक प्रकाशन सोहळ्यात भाष्य केले. दहशतवाद्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ऑपरेशन ब्लू स्टार राबवणे हा चुकीचा मार्ग होता. त्या चुकीची किंमत इंदिरा गांधी यांना जीव गमावून चुकवावी लागली. मात्र, केवळ त्यांनाच दोष दिला जाऊ शकत नाही. ती चूक म्हणजे लष्कर, गुप्तचर, पोलीस आणि नागरी संरक्षण विभागांचा एकत्रित निर्णय होता, अशी भूमिका त्यांनी मांडली.
चिदंबरम यांची ती भूमिका कॉंग्रेस श्रेष्ठींना रूचली नसल्याचे सूतोवाच पक्षातील सुत्रांनी केले. कॉंग्रेसमुळे बरेच काही मिळालेल्या ज्येष्ठ नेत्यांनी जाहीर वक्तव्ये करताना अधिक काळजी घ्यायला हवी. पक्षाची अडचण होणार नाही यासाठी दक्षता बाळगायला हवी. आपल्या वक्तव्यांमधून स्वपक्षाचीच कोंडी करणे ही सवय बनता कामा नये, असे कॉंग्रेस श्रेष्ठींना वाटत असल्याचे संबंधित सुत्रांनी नमूद केले. स्वपक्षासाठी अडचण निर्माण करण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याविषयी कॉंग्रेसमधून आश्चर्य आणि संताप व्यक्त होत असल्याचे समजते. माजी केंद्रीय मंत्री असणाऱ्या चिदंबरम यांनी याआधी केलेली काही वक्तव्येही कॉंग्रेसच्या दृष्टीने प्रतिकूल स्वरूपाची ठरली.





