पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल, शिरोली बुद्रुक येथे राष्ट्रीय हरितसेना, वनराई अंतर्गत इको क्लब, स्काऊट गाइड आणि रोड सेफ्टी पेट्रोल (आरएसपी) विभागाच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधनाचा अनोखा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी वृक्षांचे रक्षण करण्याची शपथ घेतली, तसेच ग्रामपंचायत कार्यालयातील सदस्य आणि कर्मचाऱ्यांना राख्या बांधून त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमात “वृक्षांचे रक्षण, काळाची गरज”, “झाडे लावा, झाडे जगवा, मोफत ऑक्सिजन मिळवा” आणि “वृक्ष हीच भविष्याची गरज” अशा विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला. राष्ट्रीय हरितसेनेच्या विद्यार्थ्यांनी वृक्षांना राख्या बांधून त्यांचे संरक्षण करण्याचा संकल्प केला. तसेच, शालेय विद्यार्थिनींनी सर्व विद्यार्थ्यांना राख्या बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा केला. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ म्हणून शेंगदाणा चिक्कीचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे कार्यक्रमाला आनंददायी वळण मिळाले. शिरोली बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयातही स्काऊट गाइड पथकातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींनी विशेष कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात गावचे प्रथम नागरिक सरपंच प्रदीप दादा थोरवे, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी बांगर मामा, आनंद हुलगे आणि ऋषिकेश सोनुले यांना राख्या बांधण्यात आल्या. या उपक्रमाद्वारे विद्यार्थिनींनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या गावासाठीच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयाचे मुख्याध्यापक हांडे प्रसाद आणि पर्यवेक्षक अनघा घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. राष्ट्रीय हरितसेना आणि वनराई अंतर्गत इको क्लबचे प्रमुख संतोष देवकुळे, तुकाराम निधन, स्काऊट गाइड विभागाच्या प्रमुख गाइड कॅप्टन रंजना मुंढे, शोभा कवडे, रुपाली नलावडे,प्रियांका पादीर, स्काऊट मास्टर जनार्दन खेडकर, अक्षय पाटोळे, आरएसपी विभागाचे सुनील विरणक, सुरेखा भौरले आणि सांस्कृतिक विभागाचे प्रमुख रामचंद्र अय्यर यांनी विद्यार्थ्यांना रक्षाबंधनाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्वाविषयी पौराणिक दाखलेदार माहिती दिली. या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षणाची जाणीव निर्माण होण्यासोबतच सामाजिक बंध आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचे महत्त्व अधोरेखित झाले. शालेय स्तरावर अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक मूल्ये आणि पर्यावरणप्रेम रुजण्यास मदत होत असल्याचे उपस्थित शिक्षकांनी नमूद केले. हा उपक्रम यशस्वीपणे पार पडल्याबद्दल विद्यालय प्रशासन आणि आयोजकांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.