Ozar News : न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळा उत्साहात; भक्ती-शक्तीच्या संगमाने शिरोली बुद्रुक दुमदुमले
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर न्यू इंग्लिश स्कूलमध्ये अत्यंत उत्साही आणि भक्तीमय वातावरणात (Ozar News) भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

Ozar News : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर न्यू इंग्लिश स्कूलमध्ये अत्यंत उत्साही आणि भक्तीमय वातावरणात (Ozar News) भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्स्फूर्ततेने या सोहळ्यात सहभाग नोंदवून संपूर्ण परिसर विठ्ठलमय करून टाकला, अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रसाद हांडे यांनी दिली.
कार्यक्रमप्रसंगी सुरुवातीला (Ozar News) विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रसाद हांडे आणि पर्यवेक्षक गणेश राऊत यांच्या हस्ते पालखीचे विधिवत पूजन करण्यात आले. यानंतर ‘ज्ञानोबा-तुकाराम’ आणि ‘विठ्ठल-विठ्ठल’च्या गजरात ही दिंडी गावात निघाली. विद्यार्थ्यांनी साकारलेली संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत मुक्ताबाई आणि बहिणाबाई यांसारख्या संतांची रूपे उपस्थितांचे विशेष आकर्षण ठरली.
मृदंग, पखवाज आणि टाळांच्या तालावर नाचत ही पालखी शिरोली बुद्रुक गावातील मुख्य चौकात पोहोचली. विद्यार्थ्यांनी सादर केलेले पखवाज व तालवादन अत्यंत प्रभावी ठरले. चौकामध्ये विद्यार्थ्यांनी घातलेल्या फुगड्या आणि रिंगण सोहळ्याने ग्रामस्थ थक्क झाले. त्यानंतर सुंदर अभंग आणि गवळणींच्या सुरावर विद्यार्थ्यांनी वारकरी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
गावातील विविध भागांतून (Ozar News) भ्रमण करत पालखी श्री भैरवनाथ मंदिरात पोहोचली. तेथे भैरवनाथाचे दर्शन घेतल्यानंतर दिंडी पुन्हा विद्यालय प्रांगणात परतली. यानंतर विद्यालयाच्या मैदानात दिंडीचे मुख्य आकर्षण असलेला ‘रिंगण सोहळा’ पार पडला. या रिंगणात सुरुवातीला पताकाधारी, तुळशीवृंदावन घेतलेल्या विद्यार्थिनी, पखवाज-टाळ वादक आणि विविध संतांच्या वेशातील बालकांनी शिस्तबद्ध रिंगण पूर्ण केले.
विशेष म्हणजे, या आनंदोत्सवात (Ozar News) विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही भाग घेतला. माऊलींच्या तालावर शिक्षकांनीही विद्यार्थ्यांसोबत फेर धरत फुगड्यांचा आनंद लुटला. या रिंगण सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या भेटीचा जिवंत देखावा सादर करण्यात आला. या नयनरम्य देखाव्यामुळे उपस्थितांना अभूतपूर्व अशा ‘भक्ती आणि शक्ती’च्या संगमाची अनुभूती मिळाली.
कार्यक्रमा दरम्यान विद्यालयातील सांस्कृतिक विभाग प्रमुख रामचंद्र अय्यर यांनी सुरेल भजनांचे आणि गवळणींचे गायन केले. त्यांना दिगंबर पंडित आणि पर्यवेक्षक गणेश राऊत यांनी उत्तम साथसंगत केली. सोहळ्याच्या शेवटी उपस्थितांना आणि विद्यार्थ्यांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. भक्ती आणि उत्साहाने ओसंडून वाहणाऱ्या या भव्य दिंडी सोहळ्याची अतिशय आनंदात सांगता (Ozar News) झाली.






