Pandharpur : आषाढी एकादशीपूर्वी पंढरपुरात गर्दी; रोज दाखल होताहेत लाखो भाविक
Pandharpur : दर्शनासाठी दीर्घ प्रतीक्षा

पंढरपूर – आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरात लाखो भाविकांची गर्दी पहायला मिळत आहे. पायी वारी करणे सर्वांनाच शक्य नसल्याने अनेक भाविक खासगी वाहने, बस आणि इतर माध्यमांतून पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत. त्यामुळे शहरासह मंदिर परिसरात मोठी गर्दी झाली असून भाविकांना दर्शनासाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे.
श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणस्पर्श दर्शनासाठी तब्बल नऊ ते दहा तास तर, मुखदर्शनासाठी सुमारे चार ते पाच तास प्रतीक्षा करावी लागत आहे. “विठ्ठल दर्शन” मिळावे या श्रद्धेपोटी भाविक संयमाने रांगेत उभे असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
पुणे–पंढरपूर मार्गावर संतांच्या पालखी सोहळ्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. पंढरपूर पासून पुण्याकडे जाणाऱ्या काही मार्गांवर प्रवेशबंदी करण्यात आली. मात्र, याबाबत पूर्वसूचना देणारे फलक लावले नसल्याने वाहनचालकांची मोठी तारांबळ उडाली.
अनेक नागरिकांना वाहनांमध्ये पेट्रोल किंवा डिझेल भरण्याची गरज असताना पेट्रोल पंपाच्या सुमारे ५०० मीटर आधीच रस्ता बंद करण्यात आला होता. गुगल मॅपने दाखवलेल्या पर्यायी मार्गावर सुमारे २५ किलोमीटरपर्यंत कोणताही पेट्रोल पंप नसल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागला. शिवाय पर्यायी रस्ते अरुंद असल्याने समोरासमोर दोन वाहने जाणेही कठीण होत होते आणि त्यामुळे वाहतूक कोंडी अधिक वाढली.
त्याचबरोबर चंद्रभागा नदी परिसरात अनेक भाविकांनी भोजन केल्यानंतर काही ठिकाणी कचरा तसेच उरलेले अन्न टाकल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे नदी परिसरातील स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून भाविकांनी स्वच्छता राखण्याची गरज व्यक्त होत आहे.
आषाढी वारीमुळे स्थानिक छोट्या व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
चंद्रभागा नदी परिसरात श्री विठ्ठल-रुक्मिणीची मोठी प्रतिकृती असलेल्या हातगाड्यांवर भाविकांना शुल्क भरून छायाचित्र काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. यामुळे संबंधित व्यावसायिकांना उत्पन्नाचे साधन मिळाले, तर भाविकांनाही आपल्या दर्शनाच्या आठवणी जपण्याची संधी मिळाली.
आषाढी वारीसाठी पंढरपूरमध्ये आलेल्या लाखो भाविकांमुळे निवासाची व्यवस्था उपलब्ध करून देणाऱ्या स्थानिक नागरिक, धर्मशाळा, लॉज आणि होमस्टे चालकांनाही आर्थिक फायदा झाला. याशिवाय गंध लावणारे, पूजासाहित्य विक्रेते, अल्पोपहार विक्रेते आणि इतर छोट्या दुकानांनाही यात्रेमुळे चांगला व्यवसाय झाला.
भाविकांनी प्रशासनाने वाहतूक बदल, प्रवेशबंदी आणि पर्यायी मार्गांची माहिती देणारे फलक आगाऊ लावावेत, तसेच स्वच्छता आणि मूलभूत सुविधांकडे अधिक लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे.




