Pune District : मोफत नेत्र चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
Pune District : त्यापैकी चार रुग्णांना मोतीबिंदू असल्याचे निदान झाले असून, त्यांच्या शस्त्रक्रिया एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयामार्फत मोफत करण्यात येणार आहेत.

सोरतापवाडी : एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालय, महंमदवाडी यांच्या सहकार्याने कस्तुरी ग्रुपच्या वतीने सोरतापवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र चिकित्सा शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कस्तुरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद मेमाणे यांनी सांगितले की, ’मोतीबिंदूमुक्त सोरतापवाडी’ हा संकल्प डोळ्यासमोर ठेवून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये नेत्र तपासणीसह मोतीबिंदू निदान करण्यात आले. या शिबिरात एकूण 52 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी चार रुग्णांना मोतीबिंदू असल्याचे निदान झाले असून, त्यांच्या शस्त्रक्रिया एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयामार्फत मोफत करण्यात येणार आहेत.
शिबिराचे आयोजन सोरतापवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते बापू लाड यांनी केले. यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य सनी चौधरी, प्रशांत चौधरी व रणजित चौधरी उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत कर्मचारी दिलीप चौधरी, बाळू शिंदे आणि सुमनताई चौधरी यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले. कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी निखिल बडदे तसेच एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयाच्या डॉ. हर्षदा चौधरी आणि ऋतुजा कड यांनी रुग्णांची तपासणी केली. यावेळी गरजू रुग्णांना चष्म्यांचेही वाटप करण्यात आले.





