Pune District : लोणी काळभोर येथे दिवसात 227 ज्येष्ठांना स्मार्ट कार्ड
Pune District : थेट ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयातच स्मार्ट कार्ड नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने सहभागी ज्येष्ठांनी समाधान व्यक्त केले.

लोणी काळभोर : ज्येष्ठ नागरिकांना एसटी महामंडळाच्या प्रवास सवलतींचा लाभ सुलभपणे मिळावा, या उद्देशाने ज्येष्ठ नागरिक संघ, लोणी काळभोर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या एकदिवसीय शिबिरात लोणी काळभोर, कुंजीरवाडी, थेऊर आणि कोलवडी येथील तब्बल 227 ज्येष्ठ नागरिकांनी एसटी प्रवास सवलत स्मार्ट कार्डची नोंदणी केली.
पूर्व हवेली ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष आप्पा काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांना एसटी आगारात जाऊन हेलपाटे मारण्याचा त्रास वाचला. थेट ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयातच स्मार्ट कार्ड नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने सहभागी ज्येष्ठांनी समाधान व्यक्त केले. महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम)चे अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब टेकाळे यांनी राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना एनसीएमसी कार्ड सहज, सुरक्षित आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावे, यासाठी राज्याचे परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांच्याकडे लेखी मागणी केली होती.
या मागणीची दखल घेत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अधिकृत एजंटमार्फत ज्येष्ठ नागरिक संघांच्या कार्यालयात जाऊन कार्ड नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार लोणी काळभोर येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले.शिबिरासाठी फेस्कॉम पुणे प्रादेशिक विभागाचे सचिव एकनाथ वाळुंज तसेच एनसीएमसी कार्डचे पुणे-सातारा विभाग प्रमुख श्रीकांत चित्ते यांचे विशेष सहकार्य लाभले.
याबाबत माहिती देताना एकनाथ वाळुंज म्हणाले, सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत मोठ्या नियोजनबद्ध पद्धतीने हे शिबिर पार पडले. पूर्व हवेली समन्वय समितीचे अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, सुभाष आप्पा काळभोर तसेच लोणी काळभोर ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व पदाधिकारी, संचालक आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन शिबिर यशस्वी केले.





