Pratap Sarnaik : “एक लाखांहून अधिक अमराठी चालकांनी गिरवले मराठीचे धडे” – प्रताप सरनाईक
मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि संस्कृतीचा आत्मा आहे. येथे उपजीविका करणाऱ्या प्रत्येकाने मराठीचा सन्मान करावा, हा आमचा प्रामाणिक आग्रह आहे.

Pratap Sarnaik – महाराष्ट्रात रोजगार करायचा असेल, तर मराठीशी नाळ जोडलीच पाहिजे. ही सक्तीची नव्हे, तर आपुलकीची भाषा आहे. प्रवाशांशी दोन प्रेमाचे शब्द मराठीत बोलणारा प्रत्येक चालक हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सन्मान करणारा दूत ठरतो, अशा भावनिक शब्दांत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले.
या अभियानाअंतर्गत राज्यभरातील १ लाखांहून अधिक अमराठी व्यावसायिक प्रवासी वाहन चालकांनी व्यवहारिक मराठीचे धडे यशस्वीरित्या पूर्ण केले असून, उर्वरित चालकांनीही १५ ऑगस्टपूर्वी या संधीचा लाभ घेऊन मराठी शिकावे, असे आवाहन त्यांनी केले. या अभियानाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
सरनाईक म्हणाले, मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि संस्कृतीचा आत्मा आहे. येथे उपजीविका करणाऱ्या प्रत्येकाने मराठीचा सन्मान करावा, हा आमचा प्रामाणिक आग्रह आहे. प्रवाशांशी संवाद साधताना मराठीचा वापर झाला, तर केवळ व्यवहार सुलभ होणार नाही, तर माणसामाणसांमधील आपुलकीचे बंधही अधिक दृढ होतील.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर तिच्या गौरवासाठी राबविण्यात आलेल्या या अभियानाला लाखो अमराठी बांधवांनी सकारात्मक आणि सन्मानपूर्वक प्रतिसाद दिला आहे. मराठी शिकण्याचा त्यांचा हा स्वयंस्फूर्त सहभाग म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मराठीप्रेमाला वाहिलेली खरी आदरांजली आहे.
राज्य शासनाचा मराठी भाषा विभाग, मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या संयुक्त सहकार्याने हे अभियान राज्यभर लोकचळवळीचे स्वरूप धारण करत आहे. मराठी शिकण्याची ही संधी स्वीकारणारा प्रत्येक चालक हा केवळ नियमांचे पालन करणारा नव्हे, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सन्मान करणारा संवेदनशील नागरिक ठरत असल्याचेही सरनाईक म्हणाले.





