Tukaram Mundhe : …तर राजीनामा देऊन निघून जाऊ शकता; तुकाराम मुंढेंचा 29 कर्मचाऱ्यांना थेट इशारा
Tukaram Mundhe : एकीकडे कौतुक होत असताना दुसरीकडे मात्र त्यांच्याच विभागातील काही कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विरोधात तक्रार केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Tukaram Mundhe : अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे त्यांच्या धडाकेबाज निर्णयांमुळे चर्चेत आहेत. या विभागाचा कार्यभार स्विकारल्यापासूनच त्यांची राज्यभरात चर्चा आहे. भेसळीखोरीवर रोख लावण्यात तुकाराम मुंढेंनी मोठी मोहिम हाती घेतली असून, त्यानुसार त्याची अंमलबजावणी केली जात आहे. यामुळे एकीकडे कौतुक होत असताना दुसरीकडे मात्र त्यांच्याच विभागातील काही कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विरोधात तक्रार केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
या तक्रारीनंतर आता तुकाराम मुंढेंनी देखील तक्रार देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना फैलावर घेत “ज्यांना शासनाच्या नियमांनुसार काम करायचे नसेल त्यांनी राजीनामा देऊन निघून जावे.” अशा स्पष्ट शब्दांत सुनावलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील राज्य अन्न आणि औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळेतील २९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीबाबत खात्याचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे तक्रार केली होती.
तक्रारीत काय दावा करण्यात आला आहे?
१५ जुलै रोजी मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याकडके सादर करण्यात आलेल्या निवेदनात दोन शिफ्टमध्ये काम करण्याचा निर्णय, शनिवार-रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी काम करण्याचे आदेश, रिक्त पदांमुळे वाढलेला कामाचा ताण तसेच त्यामुळे नमुन्यांच्या तपासणीच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती. असा उल्लेख करण्यात आला आहे. या निवेदनावर २९ कर्मचाऱ्यांच्या सह्याही आहेत.
तुकाराम मुंढे काय म्हणाले?
“छत्रपती संभाजीनगरमधील कर्मचाऱ्यांनी माझ्या विरोधात मंत्री महोदयांकडे तक्रार केली की सुट्टी दिली जात नाही, अनेक तास काम करावं लागतं. त्यांची पहिली मागणी आहे की, त्यांना इतर कार्यालयांप्रमाणे १० ते ६ ट्रिटमेंट द्यावी. मुळात लॅब हे कार्यालय नाही. लॅबची सेवा ही २४ तास चालणारी संस्था असते. इतर शासकीय कार्यालयात वेळ फिक्स असते पण लॅबमध्ये तसं नसते. लॅब ही २४ तास चालू ठेवायची असते, ८ तास नाही. पण याचा अर्थ असा नाही की, कर्मचाऱ्यांनी २४ तास काम करावं. त्यांना ८ तासच काम आपण लावतो, फक्त ते शिफ्टमध्ये आहे.” असं स्पष्टीकरण तुकाराम मुंढेंनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर दिलं आहे.
…तर राजीनामा देऊन निघून जाऊ शकतात : तुकाराम मुंढेंनी कर्मचाऱ्यांना झापलं
“ज्या कर्मचाऱ्यांनी माझ्या विरोधात तक्रार केली त्यांची पहिली मागणी अत्यंत चुकीची आहे, त्यामुळे ती पूर्ण होऊ शकत नाही. १० ते ६ या वेळेत त्यांना ऑफिस देऊ शकत नाही. आठवड्यात त्यांना एक सुट्टी आम्ही देतोय. त्यामुळे त्यांचा जर काही गैरसमज झाला असेल तर तो पुढच्या काळात दूर करू. आता तिथे व्यवस्थित काम सुरू आहे. या पद्धतीने काम होणे अपेक्षित आहे. ज्यांना शासन नियमांनुसार काम करायचं नाही ते राजीनामा देऊन निघून जाऊ शकतात.”
Pune Crime News: येरवडा जेलबाहेर फटाके फोडून कैद्याचे ‘ग्लोरिफिकेशन’; एक आरोपी अटकेत






