st smart card : ‘एसटीच्या स्मार्टकार्डसाठी एक कोटींहून अधिक नोंदणी’; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांना अधिक सुलभ आणि डिजिटल प्रवासाचा अनुभव देण्यासाठी सुरू केलेल्या एनसीएमसी स्मार्ट कार्डला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

st smart card : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांना अधिक सुलभ आणि डिजिटल प्रवासाचा अनुभव देण्यासाठी सुरू केलेल्या एनसीएमसी स्मार्ट कार्डला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
१२ ऑगस्टपर्यंत राज्यात तब्बल १ कोटी १ लाख ७३ हजार ८३८ प्रवाशांनी एनसीएमसी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली असून, त्यापैकी ६४ लाख ९१ हजार ६५ कार्डे सक्रिय झाली आहेत, अशी माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
एनसीएमसी स्मार्ट कार्डच्या माध्यमातून एसटी प्रवासातील तिकीट व्यवहार अधिक सुलभ आणि कॅशलेस करण्याच्या दिशेने महामंडळाने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. पहिल्या टप्प्यात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना एनसी एमसी स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात येत आहे.
येत्या १ सप्टेंबरपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे अद्याप नोंदणी न केलेल्या पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर एनसी एमसी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी करावी, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.
सरनाईक म्हणाले, एसटी ही केवळ प्रवासाची सेवा नसून महाराष्ट्राच्या जनजीवनाशी जोडलेली लोकवाहिनी आहे. या लालपरीचा प्रवास काळानुरूप अधिक आधुनिक, डिजिटल आणि प्रवाशांसाठी सुलभ करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
स्मार्टकार्डला मिळणारा प्रतिसाद हा प्रवाशांचा या डिजिटल परिवर्तनावरील विश्वास दर्शवितो. भविष्यात एसटीच्या सेवांमध्ये तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून प्रवाशांचा वेळ वाचविणे आणि त्यांचा प्रवास अधिक सोयीस्कर करणे हे आमचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी म्हटले.
दरम्यान, येत्या १५ ऑगस्टपासून राज्यभरातील सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट कार्डच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेत जाऊन एसटीचे अधिकृत परवानाधारक प्रतिनिधी ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणार आहेत.





