Shirur News : शिरूरमध्ये संतापाचा उद्रेक! प्रतिकात्मक तिरडी मांडून प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध
Shirur News : या आंदोलनस्थळी महामार्गावरील अपघातांत बळी गेलेल्यांची प्रतीकात्मक शवयात्रा, अस्ताव्यस्त वाहने आणि अपघातांची दृश्ये मांडण्यात आली.

शिरूर : पुणे–अहिल्यानगर महामार्गावरील, विशेषतः शिरूर बाह्यवळणावरील धोकादायक दुभाजक, अनधिकृत प्रवेशमार्ग आणि अपुऱ्या वाहतूक सुरक्षा उपाययोजनांमुळे नागरिकांचे जीव जात असतानाही प्रशासनाच्या उदासीनतेचा कडेलोट झाल्याचा आरोप करीत सामाजिक कार्यकर्ते नीलेश वाळूंज यांनी सोमवारी (दि.२४) तहसीलदार कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनस्थळी प्रतिकात्मक तिरडी मांडून प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध केला. मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांची छायाचित्रे तिरडीजवळ ठेवत ‘अपघातांचे बळी वाढत असताना तरी प्रशासनाचे डोळे उघडणार कधी?’ असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
पुणे–अहिल्यानगर महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणे, अनधिकृत दुभाजक क्रॉसिंग, सेवारस्ते, सुरक्षित चौक, झेब्रा क्रॉसिंग, अपुरी प्रकाशव्यवस्था, सिग्नल यंत्रणेचा अभाव तसेच रॅम्बलिंग व गतिरोधकांच्या प्रलंबित प्रश्नांवर ठोस आणि कालबद्ध कृती आराखडा तयार करण्याच्या मागणीसाठी वाळूंज यांनी मंगळवार (ता. १८) पासून तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत निषेध आंदोलन सुरू केले आहे.
दरम्यान, प्रांताधिकारी विठ्ठल जोशी, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र भोसले, पोलिस निरीक्षक विनोद पाटील तसेच महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे उपअभियंता रोहिदास गायकवाड यांनी वाळूंज यांच्याशी चर्चा केली. मात्र, मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्याने आणि जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकारी गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत वाळूंज यांनी तिरडी आंदोलन केले.
या आंदोलनस्थळी महामार्गावरील अपघातांत बळी गेलेल्यांची प्रतीकात्मक शवयात्रा, अस्ताव्यस्त वाहने आणि अपघातांची दृश्ये मांडण्यात आली. वाळूंज यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते प्रितेश फुलडाळे, शिरूर तालुका शिवपाणंद रस्ते समितीचे अध्यक्ष विजय शेलार, कल्पना पुंडे, सुनिता वाखारे, सावळेराम आवारी आदींनी तिरडीसमोर बोंब मारून प्रशासकीय दिरंगाईचा निषेध केला.
या आंदोलनाला शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब घाडगे, तालुकाध्यक्ष बापूसाहेब शिवले, तालुका संघटक शरद गद्रे, भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यासचे तालुकाध्यक्ष शिवाजी खेडकर, शिरूर बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे, शिरूर ग्रामीणच्या सरपंच शिल्पा गायकवाड, उपसरपंच संजय शिंदे, माजी उपसरपंच बाबाजी वर्पे, आधारछाया फाउंडेशनच्या अध्यक्षा सविता बोरूडे, भूमीपुत्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशांत कुटे, खिदमत फाउंडेशनचे आबीद शेख, भीमछावा संघटनेचे प्रकाश डंबाळे, शिवबा संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश घोडे, शिरूर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे, लोकजागृतीचे संघटक रवींद्र धनक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख पोपट शेलार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, मनसेचे शहराध्यक्ष संदीप कडेकर, मनसे महिला आघाडीच्या शहराध्यक्ष डॉ. वैशाली साखरे आदींसह विविध संस्था, संघटना व राजकीय पक्षांच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला.
‘अपघातांचे बळी वाढत असताना वेळकाढूपणा’
‘पुणे–नगर रस्त्यावर, विशेषतः शिरूर बाह्यवळणावर पुरेशा सुरक्षा साधनांचा अभाव असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या काही दिवसांत अनेकांना प्राण गमवावे लागले. वरिष्ठ पातळीवरून तातडीने निर्णय घेऊन युद्धपातळीवर उपाययोजना करण्याची गरज असताना प्रशासनाकडून वेळकाढूपणा सुरू आहे. जनतेचे दुःख दिसत नसल्याने मुख्यमंत्री, केंद्रीय रस्ते मंत्री, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिमांसमोर अपघातात बळी गेलेल्यांची प्रतीकात्मक तिरडी मांडली आहे,’ असे वाळूंज यांनी सांगितले.





