हिंगोली जिल्ह्यात तुरीच्या पिकावर रोगांचा प्रादुर्भाव ; शेतकरी राजा चिंतेत

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात सततच्या पावसाने सोयाबीनसह विविध पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात आता शेतात असणाऱ्या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव आल्याने शेतकरी राजा चिंतेत असल्याचे दिसत आहे. तालुक्यातील तुरीच्या पिकावर मर रोग आढळून आला आहे त्यामुळे पीक वाळून जात असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
मागील काही वर्षांपासून तूर पिकावर रोग पडत असल्यामुळे उभी पीक वाळत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी तुरी लागवडीकडे पाठ फिरविली होती. यंदा तुरीला चांगला दर मिळत असल्यामुळे शिवारात तुरीचे क्षेत्र वाढले आहे. परंतु सध्या ढगाळ वातावरणामुळे फुलोऱ्यात असलेल्या तुरीवर संकट घोंगावत आहे. त्यातच पिकांना रोगापासून दूर ठेवण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी देखील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
सेनगाव तालुक्यात साखरा, हिवरखेडा, धोतरा, खडकी, यासह अनेक गावात खरिपात सततच्या पावसाने विविध पिकांचे नुकसान झाले होते. आता सर्व आशा ही तुरीवर होती मात्र या पिकावर नवे संकट आले आहे. विविध पिकांना पावसाळ्यात जास्तीच्या पावसाचा फटका बसला. त्यानंतर खरिपातील सर्वात शेवटी येणारे जास्त कालावधी लागणारे तुरीचे पिक बहरलेले असताना त्यावर कीड व अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. तुरीचे पीक उधळत आहे.
शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन कृषी विभागाने मार्गदर्शक करावे !
सध्या तुरीवर मोठ्या प्रमाणात अळीचा व मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या मार्गदर्शनाची गरज आहे. सध्या इतरत्र शेतमालाच्या तुलनेत तुरीला हमीभाव व बाजारभाव चांगला आहे. त्यामुळे आंतरपीक म्हणून शेतकरी तूर पिकाला प्राधान्य देतात. मात्र, सध्या सोयाबीन पीक हातचे गेले, कापसाचेही उत्पादन घटले. आता तूर, रब्बी पिकांवर शेतकऱ्यांच्या आशा असताना मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे कीड रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकऱ्यांमधून विविध कीटकनाशकांच्या फवारणीवर भर दिला जात आहे. मात्र, कृषी विभागाकडून कीड रोगाच्या व्यवस्थापनाविषयी करण्याची मार्गदर्शन करण्याची मागणी शेतकऱ्यांना कडुन होत आहे.
“माझ्या दोन एकर शेतातील तुरीचे पिक वाळून जात आहे आत्ता तुरीला मोठ्या प्रमाणात फूलधारना झाली आहे व शेंगा देखील लागल्या आहे या अवस्थेत पण पूर्ण पणे तुरीचे पिक वाळून जात आहे या संदर्भात कृषी विभागाने जर वेळेवर मार्गदर्शन केले असते तर आम्ही त्यावर उपाय योजना केली असती काही आधी सोयाबीन अतिवृष्टीमुळे गेले आत्ता तूर मर रोगाने वाळून जात आहे आणि आत्ता पर्यन्त आम्हाला अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई देखील मिळाली नाही आणि पिक विमा देखील मिळाला नाही त्यामुळे प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावी.”
दत्तराव निरगुडे मु .पो .हिवरखेडा ता सेनगाव





