Pune District : शिरूर तालुक्यात लम्पी रोगाचा प्रकोप

जनावरे संकटात, भरपाई व तत्काळ उपचाराची मागणी
शिरूर – सध्या शिरूर तालुक्यातील विविध गावांमध्ये गोवंश जनावरांमध्ये लम्पी स्किन रोगाने थैमान घातले असून शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा मुख्य आधार असलेल्या जनावरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी जनावरे आजारी पडत असून काही ठिकाणी जनावरांचे मृत्यूही झाले आहेत. गंभीर परिस्थितीकडे शासनाचे व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.
सरकारी डॉक्टरांचा अभाव, उपचारांना खोळंबा, गावोगावी सरकारी पशुवैद्यकीय डॉक्टर वेळेवर उपलब्ध होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. किरकोळ खासगी डॉक्टरांकडून उपचार करूनही रोगावर फारसा परिणाम होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सरकारी स्तरावरून जलद हालचाल होणे आवश्यक आहे. असे मत शेतकरी निवृत्ती काळोखे यांनी व्यक्त केले आहे.
संक्रमणाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पशुवैद्यकीय विभागाने तातडीने घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून रोगग्रस्त जनावरांची नोंद घ्यावी, तसेच लक्षणे दिसणाऱ्या जनावरांवर त्वरित उपचार सुरू करावेत, अशी ग्रामस्थांची जोरदार मागणी आहे.
शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, लम्पीमुळे जनावरे मृत झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई देण्याचे ठोस धोरण राबवावे, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करीत आहेत. शेतकऱ्यांना आधार देणारी ही जनावरे मृत झाल्यास त्यांचे आर्थिक गणित कोलमडते. त्यामुळे भरपाई ही गरजेची आहे.





