हिंगोली जिल्ह्यात जोरदार पावसाने हाहाकार; शाळांना सुट्टी, कयाधू नदीला पूर, घरांमध्ये शिरले पाणी…सुरक्षीत स्थळी

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून मुसळधार पावसाने हाहाकार उडवला आहे. वसमत तालुक्यात शुक्रवारी रात्री ढगफुटीसदृश पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला, तर अनेक गावांत पाणी शिरले. यामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून, शेतकऱ्यांचे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने ऑरेंज अलर्ट जारी करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
वसमत तालुक्यातील किन्होळा, कुरुंदा, बहिरोबा चोंडी, राजवाडी आदी गावांत पूराचे पाणी शिरले, ज्यामुळे गावांचा संपर्क तुटला. कुरुंदा गावात ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा आणि परिसरात पाणी शिरल्याने २०० ते २५० घरे प्रभावित झाली. यापूर्वीही कुरुंदा येथे वारंवार पूरस्थिती निर्माण होत असल्याने ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे उपाययोजनांची मागणी केली होती. मात्र, अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही, अशी खंत सरपंच राजेश इंगोले यांनी व्यक्त केली.
तहसीलदार शारदा दळवी आणि उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी कुरुंदा, किन्होळा गावांना भेट देऊन नागरिकांना दिलासा दिला. कुरुंदा येथील ४० कुटुंबांचे स्थलांतर सुरू आहे. दरम्यान, हिंगोलीच्या ऐतिहासिक दसरा महोत्सवात वादळी पावसामुळे दुकानांचेही नुकसान झाले.
जिल्ह्यातील ३० पैकी १९ मंडळांत अतिवृष्टी नोंदवली गेली. हयातनगर आणि वसमत येथे १२८.८ मिमी, कुरुंदा १०४.८ मिमी, कळमनुरी १०३.८ मिमी पाऊस झाला. प्रशासनाने पूरस्थितीवर लक्ष ठेवून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
कयाधू नदीला पूर, हजारो हेक्टर शेती पाण्याखाली
हिंगोली जिल्ह्यात आज सकाळपासून ढगफुटीसदृश पावसाने थैमान घातले आहे. कयाधू नदीला आलेल्या पुरामुळे अनेक गावांत पाणी शिरले असून, कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव परिसर पुराच्या पाण्याने पूर्णतः वेढला गेला आहे. यामुळे सुमारे अडीच हजार हेक्टरवरील खरीप पिके पाण्याखाली गेली असून, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देत नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन केले आहे.
हिंगोली जिल्ह्यात मागील चोविस तासात ३० पैकी १९ मंडळात अतिवृष्टी –
हयातनगर मंडळात १२८.८ मिलीमिटर, वसमत १२८.८, आंबा ११२, गिरगाव ६७.५, हट्टा ७३, टेंभूर्णी ७८.३, कुरुंदा १०४.८, औंढा ७७.८, हिंगोली ८०, सिरसम ८०, डिग्रस कऱ्हाळे ७१.३, माळहिवरा ८०, कळमनुरी १०३.८, वाकोडी १०७, डोंगरकडा ७०, येहळेगाव ७१.३, साळणा ६६.३, जवळा ६६.५ मिलीमिटर पाऊस झाला आहे.





