पुणे जिल्हा | आमचे सरकार देणारे, घेणारे नाही

राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – राज्यातील पोलिस पाटील, आशा वर्कर, अंगणवाडी ताई आदीच्या मानधनात वाढ केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 1500 महिना दिला.
आता सरपंचाच्या मानधनात लवकरच वाढ करू, असे आश्वासन देत आमचे सरकार देणारे आहे, परत घेणारे नाही.अशा स्पष्ट शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर तोफ डागली.
अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रे निमित्ताने राजगुरूनगर येथे महिलांचा मेळावा झाला. यावेळी मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. अजित पवार म्हणाले की, राज्य आणि जिल्ह्यासह खेड तालुक्याचे अनेक प्रश्न सोडवले आहेत.
आमदार दिलीप मोहितेच्या माध्यमातून पाच वर्षात सव्वाचार हजार कोटीचा निधी खेड तालुक्याला दिला आहे. भोरगिरी- भीमाशंकर हा ड्रीम प्रोजेक्ट हाती घेतला आहे. त्यामुळे आदिवासी भागाचा विकास होईल.आदिवासी भागातील नागरिकाच्या घरकुलाचा प्रश्न सोडवला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
या कार्यक्रमात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनांतर्गत दिव्यांग महिला शुभांगी शिंदे हिला 1500 रुपयांचा प्रतिकृती धनादेश अजित पवार यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर यांनी आभार मानले.
कोणी मायका लाल संविधान बदलू शकणार नाही
लोकसभा निवडणुकीत संविधान बदलणार हा विरोधकांनी अपप्रचार केला. मात्र कोणी मायका लाल डॉ. बाबासाहेबांचे संविधान बदलू शकणार नाही.
संविधानाबाबत चुकीचा प्रचार करून लोकसभेसाठी मतदान मिळवले, असा आरोप करीत आदिवासी, अनुसूचित जाती आणि मुस्लिम समाजासाठी विविध योजना सरकारने आखल्या आहेत.
त्यातून या घटकाची उन्नती केली जाईल. लोकाभिमुख सरकार आणण्यासाठी महायुतीला साथ द्या. महायुतीच्या विचारांचे सरकार निवडून द्या, असे आवाहन, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
आढळरावांना पुन्हा डावलले
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जन सन्मान यात्रे निमित्त खेड तालुक्यात शनिवारी (दि. 17) आयोजित केलेल्या युवक व महीला मेळाव्याच्या कार्यक्रमात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना स्थान मिळाले नसल्याचे समोर आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत असलेल्या आढळराव यांचा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश झाला.
त्यांना लोकसभा निवडणुकीत अपयश आले. आजच्या जाहीर कार्यक्रमात त्यांना उघडपणे डावलण्यात आल्याने व कार्यक्रमाच्या तालुका भर झळकलेल्या फ्लेक्समध्ये पण आढळराव पाटील यांना कोठेही स्थान देण्यात आले नाही.
यामुळे आढळराव पाटील आणि त्यांच्या समर्थकांना ना घर का ना घाट का अशी अवस्था झाली असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर आढळराव यांना विचारले असता आपणांस निमंत्रण नसल्याने सहभागी झालो नाही. त्याबाबत आपली तक्रार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.





