पिंपरी – वारंवार सांगूनही काळेवाडीतील अनधिकृत नळजोडांवर कारवाई होत नाही. आता आमचं सरकार आलंय, एकएकाला कामाला लावतो, अशी धमकी सोमवारी (दि. 18) ब क्षेत्रीय कार्यालयात झालेल्या जनसंवाद सभेत एका भाजप कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.
ब क्षेत्रीय कार्यालयात सोमवारी झालेल्या जनसंवाद सभेत समन्वयक म्हणून शहर अभियंता मकरंद निकम, क्षेत्रीय अधिकारी अभिजीत हराळे, कार्यकारी अभियंता प्रशांत पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. काळेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत नळजोड आहेत. त्यावर कारवाई करावी, अशी भाजप कार्यकर्त्यांची मागणी होती.
मात्र सध्या अनधिकृत नळजोड अधिकृत करण्यासाठी महापालिकेकडून अभय योजना सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र अधिकारी पैसे घेत असल्याचा आरोप भाजपच्या त्या कार्यकर्त्यांनी केला. एवढेच नव्हे तर आता आमच सरकार आलं आहे. कामाला लावतो, अशा शब्दांत भाजपच्या त्या कार्यकर्त्यांने अधिकाऱ्यांना धमकी दिली.
याशिवाय नागरिकांनी जनसंवाद सभेत काळेवाडी परिसरात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. कुत्री किंवा इतर कोणत्याही प्राण्यांना आत आणू नये, असा फलक ज्योतिबा उद्यानाच्या आत लावण्यात आला आहे. हा फलक उद्यानाच्या बाहेर प्रवेशद्वाराजवळ लावण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.