Pune District : आपला उत्सव – आपली जबाबदारी; उरुळी कांचनमध्ये गणेश मंडळांतून स्वच्छतेचा जागर
Pune District : कचरा वेगळा करणे, योग्य ठिकाणी टाकणे आणि गणेशोत्सवाचा परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत ते नागरिकांना मार्गदर्शन करीत आहेत.

उरुळी कांचन : गणेशोत्सवाचा उत्साह कायम ठेवतानाच स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी उरुळी कांचन येथे अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘आपला उत्सव – आपली जबाबदारी’ या संकल्पनेतून गणेश मंडळांच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती केली जात आहे.
जिल्हा परिषद पुणे यांच्या पुढाकाराने, ग्रामपंचायत उरुळी कांचन यांच्या सौजन्याने आणि ड्रिम्स युवा सोशल फाउंडेशनच्या स्थानिक पातळीवरील जनसंपर्कातून उरुळी कांचनमधील 14 नामांकित गणेश मंडळांना जनजागृतीपर फलक देण्यात आले आहेत. गणेशमूर्ती प्रतिष्ठापना स्थळांच्या परिसरात हे फलक लावण्यात आले असून, उत्सवादरम्यान निर्माण होणार्या कचर्याचे योग्य वर्गीकरण करून त्याची विल्हेवाट लावण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
या मोहिमेत ओला कचरा, सुका कचरा, सॅनिटरी कचरा आणि विशेष काळजीचा कचरा अशा चार प्रकारांत कचर्याचे वर्गीकरण करण्याबाबत नागरिकांना माहिती दिली जात आहे. कचरा निर्माण होताच त्याचे योग्य प्रकारे वर्गीकरण केल्यास व्यवस्थापन सुलभ होते आणि परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत होते, हा संदेश देण्यात येत आहे.
ड्रिम्स युवाचे ग्रामदूत गणेश मंडळांना भेट देऊन भाविकांशी संवाद साधत आहेत. कचरा वेगळा करणे, योग्य ठिकाणी टाकणे आणि गणेशोत्सवाचा परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत ते नागरिकांना मार्गदर्शन करीत आहेत. स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून उत्सवात सहभागी प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी आहे, याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.
नागरिकांना कचरा वर्गीकरण प्रत्यक्ष समजावे, यासाठी तीन गणेश मंडळांना प्रत्येकी चार डस्टबिन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या माध्यमातून ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजीचा कचरा स्वतंत्रपणे जमा करण्याचे प्रात्यक्षिक करण्यात येणार आहे. ‘कचरा वेगळा करा, कचरा व्यवस्थापन सोपे करा आणि पर्यावरण वाचवा’ हा संदेश या उपक्रमातून दिला जात आहे.
गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या संख्येने नागरिक एकत्र येत असल्याने या माध्यमातून कचरा वर्गीकरणाची सवय, स्वच्छतेची जाणीव आणि पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी रुजविण्याचा प्रयत्न केला जात आहे. भक्तीचा उत्सव उत्साहात साजरा करताना परिसराच्या स्वच्छतेची जबाबदारीही जपूया, असा संदेश देत उरुळी कांचनमध्ये स्वच्छ, हरित आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संकल्प करण्यात येत आहे.





