प्रभात वृत्तसेवा ओतूर – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या (पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शिक्षण संस्था) अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय, ओतूर यांच्या “चैतन्य” या वार्षिक अंकाचे (सन २०२४-२५) प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य व अंकाचे कार्यकारी संपादक डॉ. महेंद्र अवघडे आणि मुख्य संपादक डॉ. राजेश रसाळ यांनी ही माहिती दिली. महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी वार्षिक अंक महत्त्वाची भूमिका बजावत असतो. “चैतन्य” या नियतकालिकातून वर्षभरात राबवलेले विविध उपक्रम, कार्यक्रमांचे अहवाल, विद्यार्थ्यांचा गुणगौरव, कथा, कविता, लेख, एन.एस.एस., एन.सी.सी. तसेच विविध विभागांचे अहवाल प्रतिबिंबित झाले आहेत. अंकाचे मुखपृष्ठ लक्षवेधक असून, मलपृष्ठ महाविद्यालयाचे वैभव अधोरेखित करते. प्रकाशन कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम, खजिनदार ॲड. मोहनराव देशमुख यांसह नियतकालिकाच्या संपादक मंडळातील सदस्य उपस्थित होते.