Otur Accident – कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर पिंपरी पेंढार गावाच्या हद्दीत बुधवारी (दि. १७) पहाटे पिकअप आणि स्विफ्ट कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात ओतूर येथील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अनिकेत ऊर्फ मयूर नामदेव पानसरे (रा. ओतूर, ता. जुन्नर) असे या अपघातात मृत्यू झालेल्या कार चालकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास ओतूरकडून आळेफाटाकडे जाणारी पिकअप (एमएच १४ एचजी ५६८६) आणि विरुद्ध दिशेने येणारी स्विफ्ट कार (एमएच १४ जीवाय २१३५) यांच्यात पिंपरी पेंढार परिसरात जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, स्विफ्ट कारचा पुढील भागाचा पूर्णतः चक्काचूर झाला. या दुर्घटनेत अनिकेत पानसरे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर पिकअप सोडून चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने पुढील तपास सुरू केला असून फरार चालकाचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. या घटनेमुळे ओतूर परिसरात शोककळा पसरली आहे.