Otur Accident: काळजाचा थरकाप! नगर-कल्याण महामार्गावर कंटेनर अन् दुचाकीचा भीषण अपघात; दोन मित्र जागीच ठार
Otur Accident: अहिल्यानगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर ओतूर जवळील डूंबरवाडी हद्दीत शनिवारी मध्यरात्री भीषण अपघात; दुचाकीस्वार दोन तरुणांचा मृत्यू.

Otur Accident – अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर ओतूर जवळील डूंबरवाडी (ता. जुन्नर) हद्दीत शनिवारी (दि. १३) मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास डुंबरवाडी गावच्या हद्दीत नगर-कल्याण महामार्गावरील किगा आईस्क्रीम समोर हा अपघात घडला.
आळेफाटा बाजूकडून ओतूरकडे जाणारी यामाहा मोटरसायकल (क्र. एमएच १२ एक्सएल १३८०) आणि कल्याणकडून नगरकडे जाणारा कंटेनर (क्रमांक एमएच ४६ डीसी २४५१) यांच्यात जोरदार धडक झाली. अपघातात मोटरसायकलवरील प्रणव नितीन डुंबरे (वय २५, रा. ओतूर, ता. जुन्नर) व गणेश विजय गाडेकर (रा. डिंगोरे, ता. जुन्नर) यांचा जागीच मृत्यू झाला. कंटेनर चालक गणेश बाबासाहेब शिंदे (वय ३७, रा. हिवेसिंगा,
ता. खोकारमोह, जि. बीड) याने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. सदर घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहने बाजूला हटवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस उपनिरीक्षक संदीप आमने अधिक तपास करीत आहेत.





