Strait of Hormuz : “अन्यथा होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणार नाही..”; इराणची ठाम भूमिका
इराणच्या बंदरांची बेकायदेशीरपणे केली गेलेल्या नाकाबंदीसारखी विघातक कारवाई थांबवणे आणि त्यात दुरुस्त्या करण्याची जबाबदारी आता अमेरिकेवर आहे.

Strait of Hormuz : अमेरिकेकडून जोपर्यंत इराणवरील निर्बंध हटवले जात नाहीत, तोपर्यंत होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणार नाही, असे इराणच्यावतीने आज स्पष्ट करण्यात आले. इराणच्या बंदरांची बेकायदेशीरपणे केली गेलेल्या नाकाबंदीसारखी विघातक कारवाई थांबवणे आणि त्यात दुरुस्त्या करण्याची जबाबदारी आता अमेरिकेवर आहे, असे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते ईस्माइल बघेई यांनी म्हटले आहे.
अमेरिकेने इराणच्या बंदरांची केलेली नाकाबंदी उठवायला हवी. इतक्या महिन्यांपासून युद्धामध्ये झालेल्या नुकसानीची इराणला भरपाई द्यायला हवी. इराणवरील आर्थिक निर्बंध हटवायला हवेत आणि इराणच्या गोठवलेल्या मालमत्ता पुन्हा खुल्या करायला हव्यात, अशा अटी इराणने घातल्या आहेत.
इराण आणि अमेरिका यांच्यात थेट चर्चा सुरू नाही आणि जोपर्यंत जूनमध्ये झालेल्या हंगामी कराराचे उल्लंघन अमेरिकेकडून होत राहील, तोपर्यंत इराण ही चर्चा सुरू करणार नाही, असेही अराघची म्हणाले. इराणचा हा संदेश मध्यस्थांच्या मार्फत अमेरिकेकडे पाठवून दिला गेला आहे.
मध्यस्थांच्या माध्यमातूनच संदेशांची देवाणघेवाण सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा संस्थेचे सचिव मोहम्मद बाकेर झोलकाद्र यांनी, इराणविरुद्धच्या अमेरिकेच्या पुढील धमक्या थांबवणे; इराण आणि इतर अटींचाही उल्लेख केला.
तर अमेरिका युद्धासाठी तयार आहे. पण मोठ्या हल्ल्यांची वेळ येऊ नये, असा अमेरिकेचा प्रयत्न असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटले आहे. युद्धामुळे बंद करण्यात आलेली होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून जगभरातील सागरी मालवाहतूकीपैकी एक पंचमांश वाहतूक होत असते.
ही सामुद्रधुनी बंद राहिल्यामुळे तेल आणि गॅसच्या पुरवठ्यावलर विपरीत परिणाम झाला आहे. ऊर्जा उत्पादनांच्या किंमती झपाट्याने वाढत असून याचा परिणाम नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेत होणाऱ्या मध्यावधी निवडणुकांवरही दिसण्याची शक्यता आहे.
इराण सामुद्रधुनीतून होणाऱ्या वाहतुकीसंदर्भात ओमानसोबत स्वतंत्र चर्चा करत आहे, यामध्ये संभाव्य तात्पुरत्या जलवाहतूक मार्गाचाही समावेश आहे. परंतु, सामुद्रधुनी पुन्हा सुरू करणे हे अमेरिकेसोबतच्या चर्चेवर अवलंबून असल्याचे इराणने म्हटले आहे.





