Russia-Ukraine war : युक्रेनच्या ड्रोन हल्ल्यात रशियात १३ ठार, ४८ जण गंभीर जखमी
युक्रेनने रशियाच्या निझनेकामस्क शहरावर केलेल्या ड्रोन हल्ल्यात एका बालकासह किमान १३ जण ठार आणि ४८ जण जखमी झाले आहेत.

Russia-Ukraine war : युक्रेनने रशियाच्या निझनेकामस्क शहरावर केलेल्या ड्रोन हल्ल्यात एका बालकासह किमान १३ जण ठार आणि ४८ जण जखमी झाले आहेत. तातारस्तान भागातल्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
मात्र युक्रेनने ही ड्रोन कशाला लक्ष्य करण्यासाठी डागली होती, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले नाही. निझनेकामस्क शहरामध्ये दोन मोठे तेल शुद्धिकरण प्रकल्प आणि पेट्रोकेमिकल प्लांट देखील आहेत.
निझनेकामस्क शहर युक्रेनच्या सीमेच्या पूर्वेला अंदाजे १,२०० किलोमीटरवर असून या शहराची लोकसंख्या अंदाजे २ लाख ४० हजार इतकी आहे. निझनेकामस्क शहरातल्या औद्योगिक आणि नागरी सुविधांवर युक्रेनच्या ड्रोनचा मारा झाला.
पण या नुकसानीचा तपशील अधिकाऱ्यांनी दिला नाही. या हल्ल्याबाबत युक्रेनच्या अधिकाऱ्यांनीही कोणतीही टिप्पणी केलेली नाही. आम्ही रशियाच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिले आहे. असेच उत्तर दरवेळी दिले जाईल.
हे युद्ध रशियाच्या भूमीवरच जास्तीत जास्त होल. आतापर्यंत हे युद्ध थांबले नाही, कारण रशियालाच ते थांबवावेसे वाटत नाही, असे युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी रविवारी संध्याकाळी सोशल मीडियावर म्हटले आहे.
युक्रेनकडून जवळपास दररोजच रशियाच्या तेल प्रकल्पांवर लांब पल्ल्यांच्या ड्रोनचा मारा केला जातो आहे. या हल्ल्यांमुळे रशियात तेलाची टंचाई निर्माण व्हायला लागली आहे.
रशियाकडूनही युक्रेनवर जोरदार मारा !
रशियाने देखील युक्रेनवर क्षेपणास्त्रे, ग्लाइड बॉम्ब आणि ड्रोनचा जोरदार मारा केला आहे. नागरी वस्त्यांवर केलेल्या हल्ल्यांमुळे युक्रेनमध्ये आतापर्यंत हजारो लोक मृत्यूमुखी पडले आहेत, असे संयुक्त राष्ट्राने म्हटले आहे.
युक्रेनच्या निप्रो भागात जागतिक आरोग्य संघटनेच्या युरोपातील कार्यालयाच्या एका गोदामावर २४ तासांच्या अवधीमध्ये दोनवेळा मारा करण्यात आला, असे सोमवारी सांगितले गेले.
या हल्ल्यामुळे युद्धभूमीवरच्या आरोग्य सेवांसाठी आपत्कालिन औषधांचा तब्बल ५ लाख डॉलरचा साठा नष्ट झाला, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. या हल्ल्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.





