उस्मानाबाद ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल युसुफ बाशामियाँ शेख यांचे निधन

माढा (हनुमंत मस्तुद) – परंडा येथील रहिवासी तसेच उस्मानाबाद ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल युसुफ बाशामियाँ शेख (५२) दि. ८ एप्रील रोजी कोरोना विषाणुजन्य परिस्थितीत लॉक डाऊन काळात ऑन ड्युटी असताना शिंगोली ते उस्मानाबाद प्रवासात असताना त्यांना ऱ्हदय विकाराचा झटका आला होता. त्यांना उपचारासाठी तात्काळ सोलापूर येथे यशोधरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मागील दीड महिन्यापासुन व्हेंटिलेटरवर उपचार सुरू होते परंतु उपचारादरम्यान गुरुवारी पहाटे त्यांचे निधन झाले.
शेख यांच्यावर परंडा येथील दर्गाह स्मशानभूमीत दु. ४.३० वाजता शासकीय इतमामात दफनविधी करण्यात आला. यावेळी परंडा पो.नि. इकबाल सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस विभाग उस्मानाबाद यांच्या वतीनेे पो.हे.कॉ. डी.पी. काळे, पो.कॉ. बी.जी. गोडगे, पो.कॉ. आर.बी. राठोड, पो. कॉ. आर.एस. पुरी, पो.ना.डी.बी. कलबड्डे व चालक एम.बी. पांढरे यांनी शासकीय इतमामात सलामी, शोकसलामी व हर्ष फायर करून मानवंदना दिली.
यावेळी नातलग, नागरीक, करमाळा पो.हेे. कॉ. सादीक शेख, परंडा पोलीस ठाण्याचे रामराजे शिंदे, हावळे, खोसे, कवडे, रोटे आदी पोलीस कर्मचारी उपस्थीत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, दोन मुली, चार भाऊ असा मोठा परिवार आहे. या घटनेमुळे परंडा शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.





