पुणे | पूजा खेडकर प्रकरणी संघटना आक्रमक

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशिक्षणा दरम्यान केलेले गैरवर्तन तसेच पूजा खेडकर हिचे वडील दिलीप खेडकर यांनी अधिकाऱ्यांना दिलेला दम आणि जिल्हाधिकारी यांच्यावर केलेल्या आरोपांच्या निषेधार्थ महसूल अधिकारी संघटना, तहसिलदार-नायब तहसिलदार संघटना,
महसूल कर्मचारी संघटना आणि तलाठी संघटना या चार संघटनांनी विभागीय आयुक्तांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन दिले आहे. पूजा खेडकर आणि दिलीप खेडकर यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी या संघटनांनी केली आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयात हे निवेदन देण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, हवेलीचे प्रांताधिकारी संजय असवले, उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, सिध्दार्थ भंडारे, तहसिलदार किरण सुरवसे, दिपक आकडे, राज्य महसुल कर्मचारी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष दिपक चव्हाण, कोतवाल संघटनेचे अध्यक्ष नामदेव शिंदे, महसूल कर्मचारी संघटनेचे श्रीनिवास कंडेपल्ली, सचिन तांबोळी, विनायक राऊत आदीसंह संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
पूजा खेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षण कालावधीमध्ये अत्यंत उद्दामपणाचे वर्तन केले असून ते कोणत्याही प्रशिक्षणार्थी अधिकार्यास शोभणारे नाही, प्रशिक्षणार्थी अधिकार्यास दालन, गाडी, निवास, स्वतंत्र शिपाई अशा कोणत्याही सुविधा पुरविण्याबाबतची तरतूद नसूनही त्यांनी त्याचा आग्रह धरला.
जबददस्तीने अधिकाऱ्यांना दम देऊन या सुविधा घेण्याचा प्रयत्न केला. पुजाचे वडील दिलीप खेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन अधिकाऱ्याांनी दमदाटी केलेली असल्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक अहे. पूजा खेडकर यांच्या बाबतीत समोर आलेल्या प्रकरणांचा संघटनांनी निषेध केला,
संघटना जिल्हाधिकाऱ्यांच्या पाठिशी,,,
पुणे जिल्हाधिकारी यांच्याविरुध्द पूजा खेडकर यांनी छळ केल्याची खोटी तक्रार दाखल केल्याचा या चारही संघटनांनी निषेध केला आहे. वरिष्ठ अधिकारी यांच्यावर असे आरोप करून जिल्हा प्रशासनाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रकार केला आहे, ही बाब् खपवून घेतली जाणार नाही, सर्व संघटनांना जिल्हाधिकारी यांच्या पाठीशी आहोत, असेही संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.





