Pune District : 36 गुंठ्यात 89 टन ऊस

वाल्हे : श्री सोमेश्वर साखर कारखान्याचे सभासद मांडकी (ता. पुरंदर) गावचे प्रयोगशील शेतकरी रणजीत शंकरराव जगताप यांनी आपल्या वडिलोपार्जित शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा तसेच सेंद्रिय खताचा वापर करून उसाच्या 86032 या वाणाचे 36 गुंठे क्षेत्रात 89 टन उसाचे उत्पादन घेतले असून एका उसाच्या कांड्याच्या संख्या तब्बल 44 असल्याची माहिती कृषी अधिकारी अनिल दुरगूडे, कृषी सहाय्यक नंदकुमार विधाते यांनी दिली.
जगताप यांनी दोन वेळेस उभी-आडवी नांगणी करून,दोन वेळा रोटर करून, सरी काढली. सुरूवातीपासूनच, ठिंबक सिंचनाचा वापर करीत 86032 रोप लागण केली.दरम्यान, तीन ड्रिंचिंग (आळवणी), तीन रासायनिक फवारण्या,दोन जैविक फवारणी, तसेच कोंबडी खताचा वापर करीत,रासायनिक खताचे दोन डोस व बांधणी नंतर पाच वेळा ठिंबक सिंचनच्या माध्यमातून खते सोडण्यात आली. दरम्यान, रणजीत जगताप यांनी महाधन 9:24:24 तीन बॅग, युरिया दोन बॅग, बेन्सल्फ 20 किलो यांचा वापर करीत,बाळ भरणीचा डोस दिला.बांधणीचा डोस 14 35 14 खतांच्या तीन बॅग, युरिया तीन बॅग, पोटॅश दोन बॅग, प्लॅन्टो 40 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो लिंबोळी दोन बॅग वापर केला.
मोठी बांधणी नंतर, ठिंबक सिंचनच्या माध्यमातून, बोरॉन कॅल्शियम सहा -सहा किलो दोन वेळा 15 दिवसांच्या अंतराने दोन वेळा व नंतर 20 दिवसानंतर अमोनियम सल्फेट सात किलो 0:44:44 पाच किलो असे आठ दिवसांनी चार वेळा सोडले ठिंबक सिंचन माध्यमातून सोडले होते. जैविक खत केरन कंपनीचे ओरिकेन चार लिटर दोन वेळा सोडले. जगताप यांनी याच जमिनीत सलग 13 वर्षांपासून उसाचे पिक घेत असून चार वर्षांपासून पाचट कुटी करून शेतामध्ये काढत आहे योग्य नियोजन करून, दरवर्षीच जास्त उत्पादन घेण्यात यश मिळवत आहेत.
रणजीत जगताप यांचे चुलते, मार्गदर्शक श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक विश्वास जगताप व वडील शंकरराव जगताप,मांडकी ग्रामपंचायतीचे सदस्य, अतुल जगताप, प्रगतीशील शेतकरी शिवाजी मोरे, मयूर जगताप, चेतन जगताप, योगेश जगताप, सचिन गायकवाड, अरविंद जगताप, साळुंखे सर, तेजपाल सणस, लोकेश जगताप, दिपक सावंत,श्री सोमेश्वर कारखान्याचे अॅग्री ओव्हरशियर चंद्रकांत गायकवाड, शेतकरी कृषी सेवा केंद्र मांडकीचे माधव जगताप आदींनी मोलाचे मार्गदर्शन केल्याची माहिती रणजीत जगताप यांनी दिली.
मांडकी गावाची होतेय नवी ओळख
मागील काही वर्षांपासून मांडकी गावातील अनेक शेतकरीवर्ग प्रामुख्याने ऊस उत्पादनाकडे वळला आहे. दरवर्षीच विविध प्रयोग आपल्या शेतामधील उसावर करीत अनेक प्रयोगशील शेतकरीवर्ग मोठ्याप्रमाणावर ऊस उत्पादन घेण्यात यशस्वी होत असून पुरंदर तालुका दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या तालुक्यातील वेगळी ओळख मांडकी गावातील ऊस उत्पादक शेतकर्यांमुळे होत आहे.





