कर्नाटक मंत्र्यांच्या प्रक्षोभक भाषणाच्या तपासाचे आदेश

बजरंग दल कार्यकर्त्याच्या हत्येचे प्रकरण
बेंगळुरू – कर्नाटकातील बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येच्या संदर्भाने लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने राज्यातील ग्रामीण विकासमंत्री के.एस. ईश्वरप्पा यांच्या प्रक्षोभक भाषणांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.
ईश्वरप्पा यांच्याविरोधात प्रकरण दाखल करावे, असे आदेशही न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्ष याची हत्या राजकीय आणि धार्मिक कारणामुळेच झाली आहे, असा आरोप ईश्वरप्पा यांनी आपल्या भाषणात केला होता. त्या आरोपांची छाननी करण्यात यावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.
डी. के. शिवकुमार यांच्या प्रक्षोभक भाषणामुळेच मुस्लिम गुंडांना चिथावणी दिली गेली. ही गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. असे ईश्वरप्पा म्हणाले होते. कॉंग्रेसच्या सरकारच्या कार्यकाळात भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ले होत असताना मौन बाळगल्याबद्दल त्यांनी माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्यावरही टीका केली.
सिद्धरामय्या यांच्या कार्यकाळात भाजपच्या 23 कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या. तेव्हा कुमारस्वामी गप्प का होते? असा प्रश्नही त्यांनी विचारला.




