Pune District : विकासकामांच्या कोट्यावधींच्या निधीला विरोध; राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पत्राचा निषेध
Pune District : भोरच्या विकासात असाच अडथळा आणला गेला, तर जनतेसाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, असा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने पत्रकार परिषदेत दिला.

भोर : भोर नगरपरिषदेमध्ये आमच्या पक्षाचा नगराध्यक्ष नसेल तर विकासकामे होऊ द्यायची नाहीत, अशी काहींची विचारसरणी आहे, असा टोला नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने भाजपला लगावला आहे. भोरच्या विकासकामांसाठी मंजूर झालेला ८ कोटी ८० लाख रुपयांचा निधी विरोधकांमुळे रखडला असून, तो परत जाण्याची भीती आहे. भोरच्या विकासात असाच अडथळा आणला गेला, तर जनतेसाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, असा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने पत्रकार परिषदेत दिला.
भोर नगरपरिषदेच्या प्रशासकांनी विकासकामांसाठी ८ कोटी ८० लाख रुपयांच्या निधीचा ठराव केला होता. मात्र, हा ठराव आचारसंहितेच्या काळात झाल्याचे कारण दाखवत भाजपच्या गटनेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले होते. त्यानुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी १६ एप्रिल २०२६ रोजी सदर ठराव बेकायदेशीर असल्याचे कळवले. या निधीबाबत पुन्हा ३० एप्रिल रोजी नगरपरिषदेत बैठक झाली; मात्र भाजपच्या १६ निर्वाचित व २ स्वीकृत अशा १८ नगरसेवकांनी या ठरावाला विरोध दर्शवला.
भाजपच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला असता, तर एवढा मोठा निधी परत गेला नसता, असे राष्ट्रवादीचे भोर शहराध्यक्ष विठ्ठल शिंदे यांनी सांगितले.
या विकासकामांना स्थगिती देण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही भाजप गटनेत्यांच्या पत्राचा संदर्भ देत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले होते. यावर बोलताना विठ्ठल शिंदे म्हणाले, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या मूठभर पदाधिकाऱ्यांचे ऐकून पत्र दिले, पण भोरच्या जनतेचा विचार केला नाही. तांत्रिक चुका असल्यास त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना राजकारण न करण्याचा सल्ला द्यायला हवा होता. जनतेच्या पैशातून होणारी कामे अडवणे त्यांना शोभणारे नाही. आम्ही त्यांच्या या भूमिकेचा निषेध करतो.
या पत्रकार परिषदेला शहराध्यक्ष व माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे, युवक अध्यक्ष पार्थ रावळ, ओबीसी सेल अध्यक्ष राजेश शिंदे, समीर घोणे, विक्रम शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
स्थगितीमुळे पद्मावती वस्तीला पुराचा धोका
स्थगिती आलेल्या कामांमध्ये भोर स्मशानभूमी ते पद्मावती वस्तीपर्यंत नीरा नदीच्या बाजूने सुरक्षा भिंत (वॉल) बांधण्याच्या कामाचा समावेश होता. पद्मावती वस्ती नदीकाठावर असल्याने दरवर्षी पावसाळ्यात येथे पुराचे पाणी शिरते. नागरिकांच्या सुरक्षेसाठी या भिंतीचा ठराव केला होता; मात्र आता स्थगितीमुळे या पावसाळ्यातही येथील नागरिकांना पुराच्या धोक्याला सामोरे जावे लागणार आहे.
हेही वाचा : Pune District : खडकवासला कालव्याचा पाण्याचा प्रश्न चिघळला





