Harshwardhan Sapkal : विरोधकांनी ‘ध’ चा ‘मा’ करून राजकारण करू नये; राहुल गांधीवरील टीकेला काँग्रेसने दिले प्रत्युत्तर

मुंबई : राहुल गांधी यांनी शिवजयंती निमित्त केलेल्या ट्वीटमुळे विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात आहे. महाराष्ट्राचे काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष हषवर्धन सपकाळ यांची सारवासारव करत आहेत. राहुल गांधींच्या ट्विटचे गुगल ट्रॉन्सलेट केल्यास श्रद्धांजली शब्द येतो आहे. ही एक तांत्रिक चूक पण विरोधक विनाकारण राजकरण करत आहेत, असे ते म्हणाले. तर पंतप्रधान मोदींनी देखील जयंतीच्या दिवशी श्रद्धांजली वाहिली होती, असे विजय वडेट्टीवार म्हणालेत. त्यामुळे भाजपने राहुल गांधींवर टीका करणे हा त्यांचा दुटप्पीपणा असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.
महाराष्ट्रासह देशभरात आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. शिवप्रेमींपासून राजकारण्यापर्यंत सर्वच स्तरातील लोकांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात राहुल गांधी यांनीही शुभेच्छा दिल्या. पण शिवजयंतीनिमित्ताने छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्याऐवजी त्यांनी श्रद्धांजली या शब्दाचा उल्लेख केला. यामुळे एकाच शब्दामुळे राहुल गांधी टीकेची धनी होत आहेत.
राहुल गांधींच्या बचावासाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार पुढे आले आहेत. ही एक तांत्रिक चूक पण विरोधक विनाकारण राजकरण करत आहेत, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. मी त्यांना अभिवादन करतो, मी त्यांचा आदर करतो, हा त्यांच्या मागचा भाव आहे. त्यामुळे विरोधकांनी ‘ध’ चा ‘मा’ करुन घाणेरडे राजकारण करू नये, असेही ते म्हणाले.





