Pimpri-Chinchwad: उंच इमारतींची संख्या वाढली; अग्निशमन यंत्रणा मात्र मर्यादित!
शहरात ४५ मजली इमारतींचे बांधकाम; अग्निशमन दलाची ५४ मीटरची शिडी केवळ २२ मजल्यांपर्यंतच सक्षम

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात गगनचुंबी इमारतींची संख्या वेगाने वाढत आहे. अनेक भागांत ३२ ते ४० मजल्यांच्या इमारती उभ्या राहत आहेत. चिंचवडमध्ये तर महापालिकेने ४५ मजल्यांच्या इमारतीला परवानगी दिली आहे.
मात्र एवढ्या उंच इमारतींना परवानगी देत असताना या इमारतींच्या वरच्या मजल्यांवर दुर्घटना घडल्यास तिथपर्यंत पोहचण्याची अग्निशामक विभागाची क्षमता आहे का? याचा विचार करण्यात आला नाही.
या इमारतींच्या उंचीच्या तुलनेत अग्निशमन दलाची बचाव यंत्रणा अत्यंत तोकडी आहे. सध्या उपलब्ध ५४ मीटर उंचीची शिडी साधारणतः २२ मजल्यांपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे त्यावरील मजल्यांवर आग लागल्यास बचावकार्य कसे करायचे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात बांधकाम क्षेत्राचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत आहे. जुन्या इमारतींचा पुनर्विकास आणि नवीन गृहप्रकल्पांना वेग आला आहे. बांधकाम परवानगी विभागाकडून चिंचवडमध्ये ४५ मजल्यांच्या इमारतींना मंजुरी दिली आहे. त्यामुळे शहराच्या आकाशरेषेतही मोठा बदल होत आहे.
उंच इमारतींच्या वाढत्या संख्येबरोबर अग्निशमन यंत्रणेची क्षमता वाढविणे आवश्यक आहे. सध्या अग्निशमन दलाकडे ५४ मीटर क्षमतेचे अत्याधुनिक ‘टर्नटेबल लॅडर’ वाहन उपलब्ध आहे. या वाहनाची शिडी सुमारे १७७ फूट उंचीपर्यंत पोहोचते. प्रत्यक्षात त्याद्वारे साधारण २२ मजल्यांपर्यंत बचावकार्य करता येते.
त्यामुळे २२ किंवा त्यापेक्षा अधिक मजल्यांच्या इमारतींमध्ये आग लागल्यास बाहेरील शिडीच्या माध्यमातून बचावकार्य करणे शक्य होणार नाही. अशा वेळी इमारतीच्या अंतर्गत अग्निसुरक्षा यंत्रणेवरच मोठी जबाबदारी असेल. आगीची तीव्रता वाढल्यास आणि नागरिक वरच्या मजल्यांवर अडकल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते.
अंतर्गत अग्निसुरक्षा यंत्रणा महत्त्वाची
गगनचुंबी इमारतींमध्ये आग लागल्यास केवळ अग्निशमन दलाच्या वाहनांवर अवलंबून राहता येणार नाही. प्रत्येक इमारतीत स्वतंत्र अग्निशमन जलसाठा, अग्निशमन पंप, उभ्या पाण्याच्या वाहिन्या (रायझर लाइन), स्प्रिंकलर यंत्रणा आणि फायर हायड्रंट कार्यरत असणे आवश्यक आहे.
तसेच अग्निशमन दलासाठी स्वतंत्र लिफ्ट, आपत्कालीन जिने आणि धूर बाहेर काढण्याची यंत्रणा असणे गरजेचे आहे. या सर्व यंत्रणांची नियमित तपासणी झाली पाहिजे. केवळ अग्निसुरक्षेची उपकरणे बसवून उपयोग नाही, तर ती प्रत्यक्ष आपत्कालीन परिस्थितीत कार्यरत असणे महत्त्वाचे आहे.
प्रशिक्षण आणि सरावाचीही गरज
उंच इमारतींमधील रहिवाशांना आग लागल्यानंतर काय करावे, याची माहिती असणे आवश्यक आहे. अनेकदा घबराटीमुळे नागरिक लिफ्टचा वापर करतात. त्यामुळे जीवितहानीचा धोका वाढतो. अशा घटना टाळण्यासाठी सोसायट्यांमध्ये नियमित अग्निसुरक्षा प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिके घेणे गरजेचे आहे.
दुसरीकडे, अग्निशमन दलाकडे पुरेसे प्रशिक्षित मनुष्यबळ, आधुनिक बचाव उपकरणे आणि उंच इमारतींमध्ये काम करण्यासाठी विशेष साधने असणे आवश्यक आहे. शहरातील वाढत्या बांधकामांचा विचार करून भविष्यातील गरजांनुसार अग्निशमन यंत्रणा सक्षम करणे गरजेचे बनले आहे.
नवीन वाहनाचे काम सुरू
अग्निशमन दलाच्या ताफ्यात सध्या ५४ मीटर क्षमतेचे अत्याधुनिक मॅगिरस टर्नटेबल लॅडर वाहन कार्यरत आहे. नवीन वाहन खरेदीसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. या तरतूदीतून ७० आणि ९० मीटर उंचीचे ‘टर्नटेबल लॅडर’ वाहन खरेदी करण्यात येणार आहे.
मात्र त्यासाठी प्रत्यक्षात निविदा प्रक्रिया करण्यात येणार आहे. ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेची मंजूरी घेण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित कंपनीला कामाचे आदेश दिले जातील. त्यानंतर ते वाहन तयार होऊन अग्निशामक दलात सहभागी होण्यासाठी अनेक महिन्यांचा कालावधी लागू शकतो.
‘शहराचा झपाट्याने होणारा विकास लक्षात घेऊन अग्निशमन दलाच्या भविष्यातील गरजांचा विचार केला जात आहे. सध्या उपलब्ध वाहनाची क्षमता ५४ मीटर असून नवीन वाहन खरेदीसाठी कामही सुरू आहे. त्याची क्षमता ७० मीटर आणि ९० मीटर असणार आहे.
२३ मजल्यांपेक्षा अधिक उंचीच्या इमारतीसाठी संबंधित सोसायटीने स्वतंत्र अग्निशामक अधिकारी नियुक्त करण्याची तरतूद कायद्यात आहे. तसेच उंच इमारतीचे दर सहा महिन्यांनी फायर ऑडिट करून त्याचा अहवाल अग्निशामक विभागाकडे सादर करणे बंधनकारक आहे.’
– व्यंकटेश दुर्वास, उपायुक्त अग्निशामक विभाग.





