त्रिपुरा पोटनिवडणुकीसाठी एकवटले विरोधक

आगरतळा – त्रिपुरा पोटनिवडणुकीत सत्तारूढ भाजपला कडवी लढत देण्यासाठी विरोधक एकवटले आहेत. भाजपविरोधी मतांचे विभाजन टाळण्यासाठी तिप्रा मोथा, माकप आणि कॉंग्रेस या पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.
त्रिपुरामधील विधानसभेच्या 2 जागांसाठी 5 सप्टेंबरला पोटनिवडणुकीसाठी मतदान होईल. त्या पोटनिवडणुकीत संयुक्त उमेदवार देण्याच्या निर्णयापर्यंत विरोधक पोहचले आहेत. माकप आमदाराच्या निधनामुळे विधानसभेची एक जागा रिक्त झाली आहे.
तर, केंद्रीय मंत्री प्रतिमा भौमिक यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने दुसरी जागा रिक्त झाली आहे. त्रिपुरात सहा महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणूक झाली. त्या निवडणुकीत साधे बहुमत मिळवून भाजपने सत्ता राखली.
विरोधी मतांमधील विभाजनामुळे भाजपला ते शक्य झाल्याचे मानले जाते. ती बाब विचारात घेऊन विरोधकांनी एकत्र येण्याचे ठरवले आहे.
प्रथमच विधानसभा निवडणूक लढवलेल्या तिप्रा मोथाने चांगली कामगिरी करत सर्वांत मोठा विरोधी पक्ष बनण्याचा मान मिळवला. त्यामुळे माकप आणि कॉंग्रेस हे त्रिपुरामधील प्रस्थापित पक्ष तिप्रा मोथाशी हातमिळवणी करण्यासाठी पुढे सरसावले आहेत.





