विरोधकांनी एकत्र यावे – जिग्नेश मेवाणी

पिंपरी – भाजपाला गुजरातमध्ये आम्हाला रोखता आले नाही. महाराष्ट्रात भाजपला रोखण्यासाठी सर्व पक्षांनी भाजपच्या विरोधात एकत्र आले पाहिजे. अन्यथा, विधानसभा निवडणुकीमध्ये विरोधकांच्या पारड्यात 80 जागाही पडणार नाहीत, असे परखड मत गुजरातमधील आमदार आणि राष्ट्रीय दलित एकता मंचाचे (आरडीएएम) राष्ट्रीय अध्यक्ष जिग्नेश मेवाणी यांनी बुधवारी व्यक्त केले.

संविधान दिन सोहळा समिती (पिंपरी-चिंचवड) आणि आरडीएएम यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागील मैदानात भारतीय संविधान जनजागरण अभियान कार्यक्रम आयोजित केला होता. त्या प्रसंगी मेवाणी बोलत होते. सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे अध्यक्षस्थानी होते. निवृत्त न्यायाधीश बी.जी. कोळसे पाटील, आरडीएएमचे प्रदेशाध्यक्ष निवृत्ती सांगवे, दलित एकता संघटनेचे अध्यक्ष विजय गेडाम, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष व नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, स्वीकृत सदस्य भाऊसाहेब भोईर, नगरसेविका सुलक्षणा शिलवंत-धर, माजी नगरसेवक मारुती भापकर, डॉ. सुरेश माने आदी उपस्थित होते.

मेवाणी म्हणाले, जनतेने सांगितले नाही. मात्र, राज्यातील सत्ताधारी भाजपने महाजनादेश यात्रा काढली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाही. एक राष्ट्र व अस्मिता यावरून भावनिक आवाहन केले जात आहे. पिण्याचे पाणी पुरेसे मिळत नाही. गायीचा मुद्दा पुढे करून महत्त्वाच्या मुद्दयांवरून नागरिकांना भरकटवले जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते की, मनुवाद आणि पुंजीवाद हे आपले शत्रू आहेत.

सध्या त्याचे महागठबंधन झाले आहे. ते आपल्याला तोडावे लागेल. त्यासाठी रस्त्यावर उतरणे आवश्‍यक आहे. भगवान महावीर, गौतम बुद्ध, संत कबीर अशा थोरांचा, महामानवांचा हा देश आहे. मात्र, काही जणांकडून रामाचे नाव विकण्यात येत आहे. कोळसे-पाटील म्हणाले, बहुजन समाज एकत्र येत नाही तोपर्यंत आपले राजकारण पासंगाचे आहे. त्यासाठी बहुजन समाज एकत्र आणायचा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)