विरोधकांकडून राहुल नार्वेकरांच्या निकालावर टीका; फडणवीस म्हणतात, “ज्यांना कायदा समजत नाही….’

Devendra Fadnavis : गेल्या काही दिवसांपासून विधानसभा अध्यक्षांसमोर सुरु असलेल्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय अखेर काल जाहीर केला. अध्य्क्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे यांचा गटचं अधिकृत शिवसेना असल्यावर शिक्कामोर्तब केलं. यामुळे शिंदे गटाचे आमदार अपात्र होणार नाहीत हे स्पष्ट झालं.
त्यानंतर आता ठाकरे गटाकडून याबाबत प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. हा निकाल म्हणजे भाजपाचीच स्क्रिप्ट असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. तर, आता विरोधकांच्या या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
गंगापूर उपसा सिंचन योजनेच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने फडणवीस उपस्थित असताना त्यांना माध्यमांनी नार्वेकरांच्या निकालाबाबत प्रतिक्रिया विचारली. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी राहुल नार्वेकरांच्या निकालाचं कौतुक करतानाच ठाकरे गटाचा देखील चांगलाच समाचार घेतला आहे.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, ‘हा निर्णय अध्यक्षांनी दिला आहे. मी त्यासंदर्भात आनंद व्यक्त करतो. आता कुणाच्याही मनात ही शंका असण्याचं कारण नाही की महाराष्ट्रात मजबूत सरकार आहे. हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल. ज्यांना कायदा समजत नाही, ज्यांनी कधी कायदा पाळला नाही असे लोक टीका करतात. मला याचं आश्चर्य वाटत नाही.
मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात राज्यात सरकार स्थापन करताना संवैधानिक आणि कायदेशीर प्रक्रियेचे संपूर्णत: पालन करण्यात आले होते आणि त्यामुळेच हे सरकार मजबुत आणि भक्कम आहे, असे आम्ही प्रारंभीपासूनच सांगत होतो. त्यामुळेच मा. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा आपल्या आदेशात…
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 10, 2024
कारण हे तेच लोक आहेत जे सर्वोच्च न्यायालयात त्यांच्याविरोधात निकाल गेला तर सर्वोच्च न्यायालयावरही आरोप करतात. त्यामुळे त्यांनी अध्यक्षांवर आरोप केला याचं मला आश्चर्य वाटत नाही. कारण मला माहिती होतं, काहीही निकाल आला तरी हे आरोप करणारच आहेत”, असा टोला फडणवीसांनी लगावला.





