Operation Sindoor : अंगावरची ओली हळद अन् हातावर रंगलेल्या मेहंदीसह ‘तो’ सीमेवर रवाना

Operation Sindoor Newly Wed Soldier Called On Duty : देशसेवेसाठी ३ वर्षापूर्वी भारतीय सैन्यात भरती झालेले नारायणडोहो गावचे सुपुत्र मनिष रावसाहेब साठे यांचे १० मे रोजी लग्न झाले मात्र लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना तात्काळ ड्यूटीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. अंगावरची ओली हळद आणि हातावर रंगलेल्या मेहंदीसह देशसेवेला सर्वोच्च माणुन मनिष ११ तारखेला कर्तव्यावर रुजू झाले. त्यांची पत्नी नमिता हिने ऑपरेशन सिंदूरसाठी मी माझे कुंकू पाठवत आहे अशा भावना व्यक्त केल्या.
काश्मीर खोऱ्यातील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांचा जीव घेतला. याचाच बदला भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करून घेतला. भारताच्या वतीनं ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानातील तब्बल ९ दहशतवादी स्थळं बेचिराख करण्यात आली.
त्यानंतर पाकिस्ताननं सीमेवर बेछूट गोळीबार सुरू केला. भारत आणि पाकिस्तानातील वाढलेला तणाव पाहता, लष्करातील जवानांना सुट्टी रद्द करून तात्काळ कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत.
नगर तालुक्यातील नारायणडोह येथील मनिष साठे यांचे बोल्हेगाव येथील अशोक मोकाटे यांची कन्या नमिता हिच्याशी १० मेला विवाह झाला. पण, विवाह झाल्यावर तात्काळ त्यांना सेवेमध्ये रुजू होण्याचे आदेश आले.
मनिष यांनी आपल्या अर्धांगिनीला परत येण्याचा विश्वास देऊन देशाची सेवा करण्याचा मार्ग निवडला. देशसेवेसाठी अंगावरची ओली हळद आणि हातावर रंगलेली मेहंदी घेऊन मनिष आज आपल्या पोस्टिंगच्या ठिकाणी रवाना झाले. मनिष यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे सर्वत्र कौतुक होत आहे





