Pakistan-Afghanistan war: पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणाव आता थेट युद्धात रूपांतरित झाला आहे. अफगाण तालिबानने पाकिस्तानच्या सीमावर्ती सैन्यावर हल्ला केल्यानंतर पाकिस्तानने शुक्रवारी पहाटे अफगाणिस्तानातील तालिबानच्या ठाण्यांवर जोरदार हवाई हल्ले केले. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री यांनी या संघर्षाला थेट ‘खुले युद्ध’ असे संबोधले आहे. किती जीवितहानी झाली? पाकिस्तानचे पंतप्रधानांचे प्रवक्ते मुशर्रफ झैदी यांनी सांगितले की, पाकिस्तानच्या प्रतिहल्ल्यात आतापर्यंत १३३ तालिबानी ठार आणि २०० हून अधिक जखमी झाले आहेत. काबूल, पक्तिया आणि कंदहार येथील लक्ष्यांवर हल्ले सुरू असून २७ तालिबानी ठाणी उद्ध्वस्त, तर नऊ ताब्यात घेण्यात आली आहेत. दोन कोअर मुख्यालये, तीन ब्रिगेड मुख्यालये, दोन दारूगोळा कोठारे, एक रसद तळ आणि ८० हून अधिक रणगाडे व चिलखती वाहनेही नष्ट केल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. दुसरीकडे तालिबानने ५५ पाकिस्तानी सैनिक ठार केल्याचा आणि अनेक चौक्या ताब्यात घेतल्याचा दावा केला असून पाकिस्तानने हे आकडे मान्य केलेले नाहीत. वाद कशावरून? या संघर्षाच्या मुळाशी आहे तो ‘तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ अर्थात टीटीपी हा दहशतवादी गट. पाकिस्तानचे म्हणणे आहे की हा गट अफगाण भूमीवरून पाकिस्तानात हल्ले करतो. अलीकडेच बाजूर येथे झालेल्या हल्ल्यात ११ जवान आणि दोन नागरिक ठार झाले, तो हल्ला एका अफगाण नागरिकाने केल्याचा आणि टीटीपीने तो आपला असल्याचे सांगितल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. काबूलने मात्र हे आरोप फेटाळून लावले असून आपल्या भूमीवरून शेजारी देशांवर हल्ले होऊ दिले जात नाहीत, असे अफगाणिस्तानचे म्हणणे आहे. हेही वाचा : माजी मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांचा द्रमुकमध्ये प्रवेश; विधानसभा अध्यक्षपदाचे दिले आश्वासन मित्र ते शत्रू — कसे बिघडले संबंध? २०२१ मध्ये तालिबान अफगाणिस्तानात सत्तेवर आले तेव्हा पाकिस्तानने त्यांचे स्वागत केले होते. सीमेवर स्थैर्य येईल अशी अपेक्षा होती. मात्र २०२२ नंतर परिस्थिती वेगाने बदलली. टीटीपी आणि बलोच बंडखोरांचे हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले. पाकिस्तानचा आरोप आहे की तालिबानची टीटीपीशी वैचारिक जवळीक असल्याने ते या गटावर कारवाई करत नाहीत. उलट काबूलने पाकिस्तानवर इसिसच्या दहशतवाद्यांना आश्रय दिल्याचा आरोप केला आहे. मुत्सद्देगिरी अपयशी – तुर्किये, कतार आणि सौदी अरेबिया यांच्या मध्यस्थीने ऑक्टोबरमध्ये शस्त्रसंधी घडवून आणण्यात आली होती. मात्र हल्ले सुरूच राहिल्याने आणि विश्वास पूर्णपणे संपल्याने ती शस्त्रसंधी मोडली. मुत्सद्देगिरीचे सारे पर्याय संपल्यावर आणि देशांतर्गत दबाव वाढल्यावर पाकिस्तानने थेट तालिबानच्या लष्करी पायाभूत सुविधांवरच घाव घालण्याचा निर्णय घेतला. हेही वाचा – ‘2008 नंतरची सर्वात मोठी आपत्ती’; आयटी शेअर्स कोसळले, सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या महिन्यात घसरले लष्करी ताकदीत मोठी तफावत – दोन्ही देशांच्या लष्करी ताकदीत प्रचंड फरक आहे. पाकिस्तानकडे सहा लाखांहून अधिक सक्रिय सैनिक, ४०० हून अधिक लढाऊ विमाने, सहा हजारांहून अधिक चिलखती वाहने आणि अण्वस्त्रेही आहेत. तालिबानकडे केवळ १,७२,००० सैनिक असून त्यांच्याकडे सहा विमाने आणि २३ हेलिकॉप्टर आहेत, मात्र त्यांची स्थिती अनिश्चित आहे. लढाऊ विमाने त्यांच्याकडे नाहीत. पुढे काय होणार? तज्ज्ञांच्या मते पाकिस्तान आपली लष्करी मोहीम अधिक तीव्र करेल. तालिबान सीमेवरील चौक्यांवर छापे आणि गनिमी हल्ल्यांद्वारे प्रत्युत्तर देत राहील. तालिबानला खुल्या युद्धात पाकिस्तानशी लढणे शक्य नसले तरी अनेक दशकांच्या गनिमी युद्धाच्या अनुभवामुळे दीर्घकाळ हा संघर्ष सुरू राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.