वाघोली – पुणे जिल्ह्यातील धार्मिक स्थळे तथा मंदिरे खुली करण्याची मागणी पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष किरण दगडे पाटील, संघटन सरचिटणीस संदीप सातव यांनी केली आहे.
पुणे जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने हॉटेल, बियर बार, तसेच इतर मॉल, दुकाने, क्रीडांगणे यांना निश्चित वेळा करून सोशल डिस्टंसिंग चा आधार देत सवलती देण्यात आल्या आहेत. याच प्रमाणे श्रावण महिन्यामध्ये जिल्ह्यातील धार्मिक स्थळे व मंदिरे तातडीने खुली करून नागरिकांना दर्शनाचा लाभ मिळवून देण्याकरिता जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलावी अशी मागणी पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या वतीने जिल्हाध्यक्ष किरण दगडे पाटील यांनी केली आहे.
स्थानिक पातळीवरील देवस्थान ट्रस्ट व प्रशासकीय मंदिर समिती यांनी covid-19 च्या बाबत नागरिकांना प्रबोधन करून रांगेत दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी योग्य त्या उपाययोजना राबवून सहकार्य करण्याची मागणी देखील दगडे पाटील यांनी केली आहे.
धार्मिक स्थळे तथा मंदिराच्या भोवती अनेक लहान मोठ्या हातावर पोट असणाऱ्या व्यवसायिकांना मंदिरे खुली केल्याने कुटुंबासाठी आर्थिक हातभार लावता येऊ शकतो. सध्या ही कुटुंबे उपासमारीच्या कक्षेत आहेत. शासनाने मंदिरे खुली करून मंदिराच्या भोवती असणाऱ्या रोजगाराच्या नव्या वाटा खुल्या करण्यासाठी तातडीने मदत करावी.
– संदीप सातव (संघटन सरचिटणीस, पुणे जिल्हा युवा मोर्चा)