पुणे | खुल्या प्रवर्गातील गुणवंतांना शिक्षणासाठी परदेशी संधी

पुणे,{प्रभात वृत्तसेवा} – उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत खुल्या प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून ९ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहेत, असे विभागीय तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. उमेश नागदेवे यांनी सांगितले. राज्यभरातून ४० जणांना ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
परदेशी शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांच्या आतमध्ये असायला हवे. येत्या ९ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करून कागदपत्रे अपलोड केल्यानंतर १२ तारखेपर्यंत अर्जाची प्रत, मूळ प्रमाणपत्रे, कागदपत्रे, झेरॉक्स प्रतिसह त्या-त्या विभागीय कार्यालयात जमा करावी लागणार आहेत.
याशिवाय कला, वाणिज्य, विज्ञान, विधी शाखेतर्गत विद्यार्थ्यांना विभागीय सहसंचालक कार्यालय उच्च शिक्षण येथे, तर व्यवस्थापन, अभियांत्रिकी, वास्तुकलाशास्त्र अंतर्गत विद्यार्थ्यांना विभागीय सहसंचालक तंत्रशिक्षण येथे कागदपत्रे जमा करणे आवश्यक आहे.
यासाठी पदवी, पदव्युत्तर, पीएच.डी चे उमेदवार पात्र असतील. उमेदवारांचे वय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी ३५ वर्ष आणि पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी ४० वर्ष पेक्षा जास्त नसावे.
परदेशातील पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांने भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किंमान ६० टक्के गुणांसहित पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी https://fs.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही सूचित करण्यात आले.





